मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपल्या गुढीपाडव्याच्या आणि ठाण्यातील उत्तर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता. शरद पवार (Sharad Pawar) कुठल्याही भाषणात शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतात. ते योग्यच आहे. पण ते छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chatrapati Shivaji Maharaj) महाराष्ट्र असं कधीच बोलत नाहीत, असा हल्लाबोल राज ठाकरे यांनी केला होता. इतकंच नाही तर राज यांनी शरद पवार जातीपातीचं राजकारण करत असल्याचा गंभीर आरोपही केलाय. राज ठाकरे यांच्या आरोपांना खुद्द शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आता पवार यांनी आपण शाहू, फुले, आंबेडकरांना का मानतो, याचं उत्तरच विरोधकांना दिलंय. आज औरंगाबादमध्ये ‘मुप्टा’ या शिक्षक संघटनेच्या रौप्यमहोत्सवी शिक्षक अधिवेशनाच्या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित होते.
ज्यावेळी संपूर्ण समाज अस्वस्थ होता त्यावेळी या समाजाचे सत्व जागं करण्याचं काम करुन शिवाजी महाराजांनी राज्य उभं केलं. शिवाजी महाराजांनी उभं केलेलं राज्य हे भोसल्यांचं राज्य नव्हतं तर रयतेचं राज्य होतं. शरद पवार हे फुले, शाहू, आंबेडकरांचं नाव का घेतात? असं विचारतात. प्रबोधनकार ठाकरे यांनी या संदर्भात खूप लिखाण केलं आहे. ते वाचलं तर असा प्रश्न कुणीही विचारणार नाही, असा जोरदार टोला पवार यांनी राज ठाकरेंना लगावलाय.
शरद पवार म्हणाले की, महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी सर्वसामान्यांना शिकवलं. आज फुले असतील नसतील पण त्यांचं योगदान संपणार नाही. इंग्लंडचा राजा भारतात आला तेव्हा महात्मा फुले शेतकऱ्यांच्या वेषात भेटायला गेले. त्यावेळी राज्यात दुष्काळ होता आणि त्यांनी पाझर तलाव निर्माण करण्याची मागणी केली. शेतीला जोडधंदा हवा म्हणून गायी समृद्ध झालेल्या पाहिजे. त्यासाठी गायींची नवी जात आणा अशी मागणी केली. तज्ज्ञांच्या मदतीने शेतीचं उत्पादन वाढवा यासाठी संकरित वाण आणावं, अशी मागणीही त्यांनी केली होती.
शाहू महाराज शेतकऱ्यांच्या घरात जाऊन जेवण करायचे, त्यांच्या समस्या ऐकायचे. शाहू महाराजांना खोटं बोललेलं आवडायचं नाही. काही सरदार शाहूंना भेटले आणि कर्नाटकातून ज्योतिष येणार आहेत असं सांगितलं. तेव्हा शाहू महाराजांनी माझा त्यावर विश्वास नसल्याचं सांगत भेट नाकारली. मात्र, आग्रहानंतर शाहू महाराज त्यांना भेटले. ज्योतिषी रडायला लागला. म्हणाला तुमच्या पोलिसांनी मला पकडलं, मारलं, दोन दिवस जेवायला दिलं नाही. त्यावर शाहू महाराज म्हणाले तू ज्योतिषी आहेस मग तुला हे चार दिवस आधी कळालं नाही का?, या गोष्टीचा दाखला देत पवारांनी शाहू महाराजांच्या व्यक्तित्व समजावून सांगितलं.
तर बाबासाहेब आंबेडकर यांना मानायचं कारण म्हणजे सध्या आपल्या आसपास आणि इतरत्र अनेक देश अस्वस्थ आहेत. तिथली कायदा-सुव्यवस्था अडचणीत आहे. पण आपल्या देशात अनेक आंदोलनं झाली तरीही आपला देश आजही अबाधित आहे. हे त्यांचं योगदान आहे. देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी एक सरकार बनलं होतं. यात बाबासाहेब यांच्यासह अनेक नेते होते. त्यावेळी बाबासाहेब यांच्याकडे जलसंधारण, कामगार, वीज ही खाती होती. धरणं बांधायचा निर्णय बाबासाहेबांनी स्वातंत्र्यापूर्वीच घेतला. भाकरा नांगल प्रकल्प उभारण्याचा निर्णय त्यांनीच घेतला. त्यामुळे त्या भागात आज 90 ठक्के सिंचन आहे. दामोदर व्हॅली हा प्रकल्प बाबासाहेब यांनीच मंजूर केला. आज वीज संकट आहे, बाबासाहेबांनी निर्णय घेतला एखाद्या राज्यात जास्त वीज आणि एखाद्या राज्यात कमी वीज असेल तर या राज्यातून त्या राज्यात नेण्यासाठी पॉवर ग्रीड योजनाही त्यांनीच आणली होती. त्यामुळे आपण शाहू, फुले आंबेडकर यांना मानत असल्याचं पवारांनी सांगितलं.
इतर बातम्या :