मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांना (Sharad Pawar) जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सिल्वर ओक (Silver Oak) या त्यांच्या निवासस्थानी फोन करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. “देशी कट्ट्याने ठार मारू”, असा इशारा धमकी देणाऱ्या व्यक्तीने दिला आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सिल्वर ओकवरील पोलीस ऑपरेटरने या धमकी संदर्भात पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानंतर गावदेवी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञाताविरोधात 294 आणि 506 (2) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शरद पवार यांचा काल 82 वा वाढदिवस साजरा झाला. त्यानंतर शरद पवार यांना लगेच आज धमकीचा फोन येण्याने घटनेचं गांभीर्य अधिक आहे. त्याची दखल आता पोलिसांनी घेतली आहे. या धमकीच्या फोनची चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सध्या चिघळला आहे. सांगलीच्या जत तालुक्यातील गावांवर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दावा केला. त्यानंतर महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या गाड्यांवर हल्ला करण्यात आला. त्याविरोधात राज्यातील विरोधी पक्ष आक्रमक झाला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कर्नाटकवर शाब्दिक हल्ला चढवला. 48 तासात परिस्थिती सुधारायला हवी. कर्नाटकने नरमाईची भूमिका घ्यावी, अन्यथा मला कर्नाटकला जावं लागेल, अशी भूमिका पवारांनी घेतली.
कर्नाटकला इशारा दिल्यानंतर आज पवारांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या अनुषंगाने ही धमकी देण्यात आली आहे का? अशी शंका उपस्थित केली जात आहे.
पवारांना आलेल्या या धमकाच्या फोनची पोलीस चौकशी करत आहेत. लवकरच याबाबतीतील सत्य समोर येईल.