पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यासाठी मागील काही वर्षांचा राजकीय प्रवास मोठा अडचणीचा राहिला. अनेक दिवस तुरुंगात राहण्याचीही नामुष्की छगन भुजबळ यांच्यावर आली होती. मात्र, सध्या ते पुन्हा एकदा राजकारणात जोमाने सक्रीय झाले. राजकारणातील या पुनरागमनाचं श्रेय छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दिले आहे (Chhagan Bhujbal on new Political Birth and Sharad Pawar ). शरद पवार यांनी माझा महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात समावेश करुन मला राजकीय पुनर्जन्म दिला आहे, असं मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं. ते महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्तआयोजित समता परिषदेच्या कार्यक्रमात बोलत होते (Chhagan Bhujbal on new Political Birth and Sharad Pawar ).
छगन भुजबळ म्हणाले, “महाविकासआघाडीच्या मंत्रिमंडळात मला स्थान देऊन शरद पवारांनी मला राजकीय पूर्णजन्म दिलाय. माझ्या अडचणीच्या काळात ज्यांनी ज्यांनी मला साथ दिली त्यांचे मी आभार मानतो. आज बाळासाहेबांचा पुत्र राज्याची धुरा हाती घेत आहे याचा आनंद आहे. हे सरकार किमान समान कार्यक्रमानुसारच चालेल. त्यासाठीच सर्वांनी चर्चा करुन हा किमान समान कार्यक्रम ठरवला आहे आणि त्यावर स्वाक्षऱ्या देखील केल्या आहेत.
मी बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली माझी राजकीय आणि सामाजिक कामाची सुरुवात केली. त्यानंतर काही कारणाने मी काँग्रेसमध्ये गेलो. जेव्हा शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले, तेव्हा मी देखील त्यांच्यासोबत बाहेर पडलो आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलो. आज मला आनंद आहे की शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र आले आहेत. ते महाराष्ट्राचं सरकार स्थापन करतील. हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल आणि त्यापुढे देखील सत्तेवर येईल.
शरद पवार यांनी ज्या दोन आमदारांना मंत्रिपद देण्याचा निर्णय घेतला त्यात माझा समावेश आहे. कोणतं मंत्रिपद देणार यावर कोणताही निश्चिती झालेली नाही. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसचे नेते बसून यावर निर्णय घेतील. त्याआधी सरकार स्थापन करुन सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार विश्वासदर्शक ठराव घ्यायचा आहे, असंही भुजबळ यांनी नमूद केलं.