मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यावेळी महाविकासआघाडीकडून राज्यसभेवर जाणार आहेत (Sharad Pawar going to contest election from MVA). 2 एप्रिल रोजी राज्यसभेच्या एकूण 7 जागा रिक्त होत आहेत. यापैकी महाविकास आघाडी 4-5 जागा हमखास जिंकण्याची शक्यता आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत आल्याने महाविकासआघाडीची ताकद वाढली आहे. यापैकीच एका जागेवरुन शरद पवारही राज्यसभेवर जातील.
राज्यात महाविकास आघाडी तयार झाल्यानंतर स्थानिक पातळीपासून राज्य पातळीवर राजकारण बदललं आहे. येत्या राज्यसभा निवडणुकीतही महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढणार आहे. त्यामुळे 7 पैकी 5 जागा महाविकास आघाडीच्या पारड्यात पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मार्च महिन्यात राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक होणार आहे. विधानसभेच्या आमदारांच्या मतदानातून राज्यसभेवर 7 जण निवडून जाणार असून त्यात 5 जागा अपक्षांच्या मदतीनं आघाडीला मिळण्याची शक्यता आहे. राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी पहिल्या पसंतीची 37 मतं गरजेची आहेत. त्यामुळं आघाडीचे 4 तर भाजपचे 2 उमेदवार निवडून येतील. राहिलेल्या मतांमधून आणखी एक उमेदवार निवडून आणण्याचा आघाडीचा प्रयत्न असणार आहे.
राज्यसभेतून राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, माजिद मेमन, काँग्रेसचे हुसेन दलवाई, शिवसेनेचे राजकुमार धूत, भाजपचे अमर साबळे, रामदास आठवले, भाजप समर्थक अपक्ष खासदार संजय काकडे निवृत्त होत आहे. त्यात महाविकास आघाडीची नावं ठरली नसली तरी शरद पवार यांचं नाव यात निश्चित मानलं जात आहे.
राज्यसभेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रत्येकी 2 आणि काँग्रेसचा 1 उमेदवार निवडून येऊ शकतो, अशी परिस्थिती आहे. शरद पवार वगळता या निवडणुकीत नवीन चेहऱ्यांना संधी द्यायचा महाविकास आघाडीच्या नेत्यांचा प्रयत्न असणार आहे.
राज्यसभेच्या सात जागांबाबत महाविकास आघाडीतील 3 घटक पक्षांचे नेते एकत्रित बसून निर्णय घेणार आहेत. त्यामुळं राज्यसभा निवडणुकीत सातव्या जागेसाठी भाजपनं उमेदवार दिल्यास चुरस पाहायला मिळेल. पण छोटे आणि अपक्ष सत्ताधारी पक्षाच्या बाजूनं राहिल्याचं दिसून येतं. त्यामुळं भाजपला एका जागेचा फटका बसू शकतो.
Sharad Pawar going to contest election from MVA