पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आत्तापर्यंत जनतेला भोपळाच दिला आहे, त्यामुळे त्यांच्या हातातही आता भोपळाच द्या, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारांवर केली. ते बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार कांचन राहुल कुल यांच्या प्रचार सभेत इंदापूर येथे बोलत होते.
शरद पवारांनी आत्तापर्यंत या भागातील जनतेचा फक्त वापर करुन घेतला. तसेच येथील जनतेच्या हाती त्यांनी भोपळा दिला. परंतू आता या निवडणुकीत जनताच पवारांना भोपळा देणार आहे, अशी टीका फडणवीसांनी केली. तसेच इंदापूर तालुक्यातील 22 गावांचा पाणी प्रश्न सोडवणार असल्याचीही ग्वाही फडणवीस यांनी दिली.
‘पवारांनी भाड्याने रेल्वेच इंजिन घेतले, पण त्यांना माहितीच नाही ते बंद पडले आहे’
मुख्यमंत्री फडणवीस यांनी पवारांसह मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मनसेवरही टीका केली. ते म्हणाले, ‘पवार साहेबांची इतकी वाईट अवस्था झाली आहे, की त्यांना रेल्वेचे इंजिन घेण्याची वेळ आली. पण हे रेल्वेच इंजिन बंद पडके आहे, हे त्यांना माहिती नाही.’ यातून फडणवीस यांनी राज ठाकरेंचे नाव न घेता टीका केली.
‘सुप्रिया सुळेंनीही मोदींकडून काही गोष्टी शिकून घेतल्या’
काही दिवसांपूर्वी सुळे यांची एक कथित ऑडिओ क्लिप वायरल झाली होती. त्याचा दाखला देत फडणवीस म्हणाले, ‘पंतप्रधान मोदी म्हणाले होते की घरात घुसून मारीन. आता सुप्रिया सुळेही घरात घूसून मारीन, असे म्हणू लागल्या आहेत.’ फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर सभेत एकच हशा पिकला. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे, पशु संवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर, ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे, आमदार राहुल कुल, उत्तम जानकर आदी मान्यवर उपस्थित होते.