राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार यांची मोठी खेळी, पवार यांच्या खेळीने भाजपला खिंडार पडणार?

| Updated on: Jul 27, 2023 | 2:53 PM

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार कामाला लागले आहेत. त्यासाठी शरद पवार यांनी तीन प्लॅन तयार केल्याचं सांगितलं जात आहे. पहिल्या प्लॅननुसार शरद पवार हे पक्ष बांधणीवर जोर देणार आहेत.

Follow us on

पुणे | 27 जुलै 2023 : अजित पवार यांनी आमदारांचा एक गट घेऊन राष्ट्रवादीत बंड केलं. त्यानंतर अजित पवार यांनी शिंदे सरकारमध्ये सहभागी होऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली. मधल्या काळात शरद पवार यांनी भाजपसोबत हातमिळवणी करण्यासाठी अजित पवार यांच्या गटाकडून शरद पवार यांच्यावर दबावही आणला गेला. मात्र, शरद पवार यांनी भाजपसोबत हातमिळवणी करण्यास नकार दिला आहे. पवारांनी पुन्हा ताकदीने उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी राज्यभर दौरेही सुरू केले आहेत. आता अजिदादा आणि भाजपला नामोहरण करण्यासाठी शरद पवार मोठी खेळी खेळण्याच्या प्रयत्नात आहेत. पवार यांच्या या खेळीमुळे भाजपलाच सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्लॅन – एक

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार कामाला लागले आहेत. त्यासाठी शरद पवार यांनी तीन प्लॅन तयार केल्याचं सांगितलं जात आहे. पहिल्या प्लॅननुसार शरद पवार हे पक्ष बांधणीवर जोर देणार आहेत. त्यानुसार राज्यातील महत्त्वाचे जिल्हे आणि तालुक्यात शरद पवार यांच्या सभा होणार आहेत. या भागातील जनतेशी शरद पवार संवाद साधणार आहेत. त्यातही ज्या भागात राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे, त्या भागावर शरद पवार सर्वाधिक फोकस करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नेते गेले तरी कार्यकर्ते आणि जनता आपल्यासोबत राहील याची काळजी शरद पवार घेणार असल्याचंही सूत्रांनी सांगितलं,

प्लॅन – दोन

शरद पवार यांच्या दुसऱ्या प्लॅननुसार ते लवकरच पर्यायी नेतृत्व निर्माण करणार आहेत. ज्या आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली त्यांच्या मतदारसंघात पर्यायी नेतृत्व उभं केलं जाणार आहे. पक्षातील माजी आमदारांना पुन्हा सक्रिय केलं जाणार आहे. त्यांना बळ आणि रसद पुरवली जाणार आहे. माजी आमदारांनी निवडणुकीत उतरवं या हिशोबानेच त्यांना तयार केलं जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

प्लॅन – तीन

शरद पवार यांची तिसरी खेळी भाजपसाठी खतरनाक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या खेळीनुसार शरद पवार हे भाजपमधील ज्या माजी आमदारांना अडगळीत टाकण्यात आलं आहे, त्यांना आपल्यासोबत घेणार आहेत. या माजी आमदारांना राष्ट्रवादीत घेऊन त्यांना रसद पुरवली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. भाजपने माजी आमदारांकडे दुर्लक्ष केले आहे.

त्यामुळे या आमदारांना राजकारणात कमबॅक करायचा आहे. पण भाजपकडे इतर पक्षांच्या नेत्यांचा ओघ वाढल्याने त्यांना कमबॅक करता येत नाहीये. त्यामुळे या नाराज आणि अस्वस्थ आमदारांवर शरद पवार यांची नजर असून त्यांना आपल्याकडे खेचण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या माजी आमदारांना फोडण्यात शरद पवार यांना यश आल्यास भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता वाढली आहे.

विद्यमान आमदारांना तोंड देण्यासाठी आणि त्यांना पर्याय देण्यासाठी माजी आमदारांना आपल्याकडे खेचण्याचा शरद पवार यांचा प्रयत्न असल्याचं सूत्रांनी सांगितलं. मात्र पवार यांच्या या प्रत्नांना किती यश मिळतं हे पाहावं लागणार आहे.