नागपूर : एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर राज्यातील महाविकास आघाडी (MahaVikas Aghadi) सरकार कोसळलं. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरुन पायउतार व्हावं लागलं. महाविकास आघाडीच्या रुपात शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी झालेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाही सत्ता सोडावी लागली. शिवसेनेचे तब्बल 40 आमदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत गेले. आता पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात उतरले आहेत. त्यांनी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकांचा सपाटा लावलाय. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारही (Sharad Pawar) मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे. पवार यांनी आज थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बालेकिल्ल्यात धडक दिलीय. त्यावेळी बोलताना आगामी निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीने एकत्र लढायला हवं, काँग्रेससोबतची चर्चा करायला हवी, असं वक्तव्य केलंय. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा महाविकास आघाडी दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना यांनी महाराष्ट्रातील निवडणुका एकत्रित लढवल्या तर लोकांना जो हवा आहे तशाप्रकारचा निर्णय घेण्याची संधी मिळेल. त्यामुळे आधी आम्ही पक्षीय पातळीवर चर्चा केली नाही. माझंही मत तेच आहे. माझं मत ते असलं तरी आधी काँग्रेससोबत चर्चा करावी लागेल. त्यांच्यासोबत अद्याप चर्चा केली जाईल. आम्हाला शिवसेनेसोबत बोलावं लागेल. त्यांचं मत ते असलं तर चर्चा केली जाईल. या प्रश्नावर आम्ही तिघेही एकत्र बसून आणि यात शक्य झालं तर एकत्र निर्णय घेऊ, अशी सूचक प्रतिक्रिया शरद पवार यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर दिलीय.
पवार यांनी यावेळी भाजपवर जोरदार टीका केली. आम्ही सांगतो त्या पद्धतीने काम करा. अधिकारांचा गैरवापर केला जातो. सत्तेचा जोश असतो. आज देशाची सत्ता विशिष्ट लोकांच्या हाती केंद्रीत झाली आहे. सभागृहात म्हणणं ऐकलं पाहिजे. सभात्याग करायचा आणि गांधीजी यांच्या पुतळ्यासमोर बसायचं. आमच्या हातात सत्ता द्यावी, आम्ही सत्ता केंद्रीत करु असं चालत नाही. जेव्हा जेव्हा हुकुमशाही आली आणि ती संपली. सत्तेचा गैरवापर करत असाल तर ते टिकत नाही. आपण एकसंघ राहिलं पाहिजे. लोकशाहीत बाबासाहेबांनी हा अधिकार आपल्याला दिला आहे. आपण राष्ट्रवादीच्या माध्यमातून शक्तिशाली संघटन तयार करू, असंही पवार नागपुरात म्हणाले.