विनायक डावरुंग, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 16 डिसेंबर 2023 : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचंड आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणाला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचाच सर्वाधिक विरोध होता. शरद पवार यांनीच मराठा आरक्षणाला आतापर्यंत विरोध केलेला आहे, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसेच मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाहीत का? असं सुप्रिया सुळे म्हणायच्या. दोघांनाही मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नव्हतं. त्यांना समाजाला झुंजत ठेवायचं होतं, असा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी केला.
भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी हा गंभीर आरोप केला आहे. मराठा आरक्षणाला शरद पवार यांनीच विरोध केला होता. त्यांच्या मनात असतं तर मंडल आयोग लागू झाला तेव्हाच त्यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं असतं. पण त्यांनी फक्त मराठा समाजाला झुंजवत ठेवायचं काम केलं. लोक आपल्याकडेच आले पाहिजेत हा त्यामागचा हेतू होता. मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाहीत का असं सुप्रिया सुळे महाविकास आघाडीचं सरकार असताना म्हणायच्या, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. त्यावेळी मंडल आयोगाला शिवसेनेनेच विरोध केला होता. भुजबळ का बाहेर पडले होते? कारण त्यावेळी तुम्ही मंडल आयोगाला विरोध केला होता म्हणून. पण आपली भूमिका पक्की आहे. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण द्यायचं आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात हा प्रयत्न सुरू आहे. कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का लागू देणार नाही. ही आमची कमिटमेंट आहे, असं सांगतानाच कार्यकर्त्यांमध्ये जातीचे गट तयार होऊ देऊ नका. ओबीसी आणि मराठा समाजाच्या मनात तेवढीच कमिटमेंट हवी. मराठा समाजाला आम्ही न्याय देणार आहोत. पण ओबीसींवर अन्याय होऊ द्यायचा नाही. आरक्षण महत्त्वाचे आहे. पण गरीबीचे मागासलेपण दूर करत नाहीत, तोपर्यंत मागासलेपणाची भावना दूर होऊ शकत नाही, असंस फडणवीस म्हणाले.
यावेळी त्यांनी इंडिया आघाडीवरही टीका केली. विरोधकांनी इंडिया आघाडीची स्थापना केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हरवण्याचं ठरवलं. त्यासाठी 6 डिसेंबर रोजी बैठकही घेतली. पण त्या बैठकीला कोणीच गेलं नाही. या आघाडीसमोर कोणतंही ध्येय नाही. विकासाचं ध्येय नाही. मोदी हटाव हेच त्यांचं सूत्र होईल. मोदींना हटवलं नाही तर त्यांच्या कुटुंबांची दुकाने बंद होतील. त्यांचं कुटुंब म्हणजे देश आहे. तर मोदींसाठी देश म्हणजे कुटुंब आहे, असं फडणवीस म्हणाले.
पुढचे नऊ दहा महिने आपल्याला पूर्ण वेळ पक्षासाठी काम करायचे आहे. त्यासाठी पक्षाला वेळ द्या. आपण तीन पक्ष महायुतीत आहोत. तीन पक्षाचं सरकार आहे. आता कोणतीही निवडणूक असो, आपण एकत्र लढणार आहोत. जागेची काळजी करू नका. तुमच्या मनात आहेत, तेवढ्या जागा आपल्याला मिळणार आहे, असं सूचक विधान त्यांनी केलं.
आज महाराष्ट्रात सामान्य माणसाला मोदीजींच आकर्षण आहे. काही माणसं काहीतरी वेगळ्या गोष्टी पसरवतात. सामान्य माणसाला वाटतं की जो काही विकास होईल तो मोदींजीमुळे. विरोधक डॅमेजिंग मानसिकतेत गेले आहेत. तीन निवडणूका हरले म्हणून त्यांची वैचारिक दिवाळखोरी निघाली आहे. आपण जेव्हा विरोधक होतो तेव्हा विकासाचे विरोधक नव्हतो. देशाची हानी होईल अस आपण कधीच वागलो नाही. पण दुर्देवाने विरोधी ज्या मानसिकतेत गेले आहेत त्यांना देशाची चिंता नाही. विरोधक अनार्किस्ट भूमिकेत गेले आहेत. रोज भूमिका बदलत आहेत. उद्धव ठाकरे यांची सेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांना देशाची समाजाची चिंता नाही, असं फडणवीस म्हणाले.