नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar meet Sonia Gandhi) यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. संध्याकाळी पाचच्या सुमारास ही भेट झाली. शरद पवार (Sharad Pawar meet Sonia Gandhi) हे सोनिया गांधी यांच्या दिल्लीतील 10 जनपथ या निवासस्थानी दाखल झाले. तिथे दोघांमध्ये जवळपास 50 मिनिटे चर्चा झाली. या भेटीनंतर शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधून चर्चेचा तपशील सांगितला.
शरद पवार म्हणाले, “सोनिया गांधी आणि ए के अँटोनी यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली. महाराष्ट्रातील राजकीय स्थितीबाबत सविस्तर चर्चा झाली. राज्यातील स्थिती सोनिया गांधी यांना सांगितली. या परिस्थितीवर लक्ष ठेवू, वरिष्ठ नेत्यांचं मत घेऊन पुढील रुपरेषा ठरवू. एवढीच चर्चा झाली”
आम्ही राज्यातील राजकारणाविषयी चर्चा केली. महाराष्ट्रातील राजकीय स्थितीबद्दल त्यांना माहिती दिली. इतर कोणतीही चर्चा झालेली नाही. आम्ही नजर ठेवणार पुढे पावलं काय असणार हे ठरणार. या स्थितीबाबत त्यांचा विचार काय याबाबत चर्चा करणार. कोणासोबत सरकार बनवावं याबाबत कोणतीही चर्चा नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना एकत्र येण्यावर काही जण नाराज आहेत. राजकीय स्थितीबाबत चर्चा करताना युती झालेल्या पक्षांनाही सोबत घेतलं पाहिजे. कोणासोबतच जायचं की नाही याबाबतच चर्चा झाली नाही, असं शरद पवारांनी सांगितलं.
भाजपने काय करावं हा त्यांचा निर्णय आहे. आमच्याकडे सहा महिने वेळ आहे. शिवसेनेसोबत जाण्याची चर्चा सोनिया गांधी यांच्यासोबत झाली नाही. बैठकीत राष्ट्रवादी, काँग्रेस आणि सोबत निवडणूक लढलेल्या मित्रपक्षांसोबत चर्चा झाली, असं पवार म्हणाले.
सत्तास्थापनेबाबत आम्ही चर्चाच केलेली नाही, त्यामुळे शिवसेनेबद्दल काही सांगू शकत नाही. आम्ही छोट्या पक्षांना नाराज करणार नाही, आम्ही समाजवादी पार्टी, स्वाभिमानी यांच्याशीही चर्चा करणार आहोत. आमच्यासमोर 6 महिन्याचा वेळ आहे. शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि देसाईंसोबतची चर्चा फक्त आमदार म्हणून केली. या बैठकीत फक्त काँग्रेस- राष्ट्रवादीबाबतच चर्चा झाली, असं पवारांनी सांगितलं.
शिवसेना म्हणते पवार आमच्यासोबत आहेत, या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, आम्ही सर्वांसोबत आहे.
भाजपच्याविरोधात आम्ही निवडणूक लढवली, मग आम्ही भाजपसोबत जाण्याचं कसं बोलू शकता, असा सवाल पवारांनी विचारला.
किमान समान कार्यक्रमावर अद्याप चर्चाच नाही, शिवाय शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबतही सोनिया गांधींसोबत चर्चा झाली नाही, असं शरद पवार यांनी सांगितलं.