नवी दिल्ली : राज्यात शिवसेनेसोबत सत्तास्थापन करण्याबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Meeting of Sharad Pawar and Sonia Gandhi) दिल्लीला रवाना झाले आहेत. आज ते काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट (Meeting of Sharad Pawar and Sonia Gandhi) घेऊन किमान समान कार्यक्रमावर चर्चा करतील. यावेळी सत्ता वाटपाचा फॉर्म्युलाही निश्चित होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत देखील रविवारीच दिल्लीला पोहचले आहेत. त्यामुळे दिल्लीतील घडामोडींकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढ्याबाबत चर्चेसाठी नुकतीच राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. शरद पवारांच्या पुण्यातील निवासस्थानी मोदीबागेत ही बैठक झाली. राष्ट्रवादीच्या या बैठकीत जयंत पाटील, अजित पवार, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे यांसह इतर महत्त्वाचे नेते उपस्थित होते. पुण्यात झालेल्या या बैठकीत राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. याबाबत काँग्रेसशी बोलून चर्चा करु असा निर्णय झाल्याचंही सांगण्यात आलं.
दरम्यान आज शरद पवार आणि सोनिया गांधी यांची नवी दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीनंतर मंगळवारी राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची चर्चा करुन पुढील निर्णय घेतला जाईल, असंही राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं आहे. त्यामुळे महासेनाआघाडीबाबत काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यात 17,18, 19 नोव्हेंबरला सलग 3 दिवस मॅरेथॉन बैठका आयोजित करण्यात आल्याचीही माहिती मिळाली होती. मात्र, 17 नोव्हेंबरला होणारी बैठक रद्द करण्यात आली. त्याऐवजी सोमवारी 18 नोव्हेंबरला याबाबतची बैठक होणार आहे.
या बैठकीला काँग्रेसकडून सोनिया गांधी यांच्यासोबत काँग्रेस नेते अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, सुनिल तटकरे हे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
संबंधित बातम्या :
राष्ट्रवादीची पुण्यात बैठक, शरद पवार आणि सोनिया गांधींची भेट पुढे ढकलली
शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीची तारीख ठरली, महासेनाआघाडीच्या फॉर्म्युलावर अंतिम चर्चा ?