सोलापूर : “2009 च्या निवडणुकीत सत्तेचा गैरवापर करुन शरद पवार विजयी झाले होते”, असा आरोप सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केला. भाजप कार्यकर्त्यांच्या टेंभुर्णी येथील बैठकीदरम्यान त्यांनी राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर टीकास्त्र सोडलं.
लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. सध्या संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या विरोधात भाजपकडून सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची उमेदवारी जवळपास निश्चित मनाली जात आहे. या दरम्यान देशमुख यांनी पवार यांच्यावर जोरदार टीका करत 2009 चा विजय हा केवळ सत्तेचा गैरवापर आणि बोगस मतदानामुळे झाल्याचा दावा केला आहे.
2019 ला परिस्थिती बदलली आहे. असे कोणतेही गैरकृत्य आता करु दिले जाणार नाही, असा इशाराही देशमुखांनी दिला. माढा तालुक्याची भाजप कार्यकर्ता बैठक आज टेंभुर्णी येथे पार पडली. त्यावेळी मंत्री सुभाष देशमुखांनी शरद पवार आणि राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली.
राष्ट्रावादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषमंत्री शरद पवार हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. ते माढा मतदार संघातून निवडणूक लढणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदारंसघातून शरद पवार राष्ट्रवादीचे उमेदवार असतील. माढा मतदारसंघ हा शरद पवारांसाठी नवीन नाही. 2009 साली शरद पवार यांनी माढ्यातून निवडणूक लढवली होती आणि जिंकलेही होते.
माढा लोकसभा मतदारसंघाची निर्मिती 2009 मध्ये मतदारसंघ पुनर्रचनेनंतर झाली. त्यापूर्वी येथे पंढरपूर राखीव लोकसभा मतदारसंघ होता. या मतदारसंघातून पुनर्रचनेनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले होते. त्या निवडणुकीत शरद पवारांनी भाजपचे सुभाष देशमुख आणि रासपचे महादेव जानकर यांना पराभूत केले होते.
त्यानंतर 2014 मध्ये माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली होती, तर भाजपने ही जागा स्वाभिमानी पक्षाला सोडून येथे विद्यमान कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना उमेदवारी दिली होती. याच निवडणुकीत विजयसिंह मोहिते पाटील यांचे सख्खे बंधू स्व. प्रतापसिंह मोहित पाटील यांनी ही अपक्ष उमेदवारी दाखल केली व निवडणूक लढविली होती.