…. तर बाळासाहेबांनी फटके दिले असते : शरद पवार

| Updated on: Dec 20, 2019 | 3:12 PM

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जबाबदार एमजीएमकडे देऊन पाहावी, असा सल्ला शरद पवारांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिला.

.... तर बाळासाहेबांनी फटके दिले असते : शरद पवार
Follow us on

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) यांनी आज औरंगाबादेतील एमजीएम शिक्षण संस्थेतील अंकुशराव कदम यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात शरद पवारांनी (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) अनेक किस्से तर सांगितलेच, शिवाय अनेक विषयांवर परखड भाष्य केलं.

“एमजीएम परिसरात बाळासाहेब ठाकरे  यांच्या पुतळ्यासाठी झाडे तोडणार होते असे ऐकलं. मात्र आज बाळासाहेब असते आणि त्यांना असे कळले असते, तर त्यांनी फटके दिले असते, मी त्यांना ओळखायचो, झाडे तोडायचे समर्थन त्यांनी कधीच केलं नाही”, असं शरद पवार म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जबाबदार एमजीएमकडे देऊन पाहावी, असा सल्ला शरद पवारांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिला.

माणसं सांभाळण्याची जबाबदारी

निवडणुकीला सामोरं जायचं म्हणजे आमच्यासारख्यांकडे एक जबाबदारी असते, ती म्हणजे माणसं सांभाळण्याची. त्यानिमिताने अनेक माणसांत आणि समाजात जावं लागतं. लोकशाहीमध्ये मतांचं महत्व दुर्लक्षित करुन चालत नाही, असं शरद पवार म्हणाले.

शाळेचा किस्सा

मला एकजण भेटला तेव्हा मी त्याला विचारलं की काय काम करता? तेव्हा तो म्हणाला की  माझी शाळा आहे. मी विचारलं की प्रपंच कसा चालतो? तर म्हणाला की शाळा आहे. प्रपंच चालवण्यासाठी शाळा, हे काय मला समजलं नाही. आमच्यासारख्यांना माहीत आहे की शेती असली आणि दारात चार म्हशी असल्या तरी घर-प्रपंच चालतं. मात्र जेव्हा लोक शाळेचा वापर प्रपंच  चालवण्यासाठी करतात तेव्हा मला चिंता वाटते, असं शरद पवार म्हणाले.

एमजीएमच्या बाबतीत मात्र कधी असं घडलं नाही. अनेक लोकांचे मदतीचे हात मिळत गेले आणि बाबुराव यांनी एमजीएम वाढवलं, असं पवारांनी नमूद केलं. मला कधीही चाळीस टक्केच्या वर गुण  मिळाले नाहीत. कधी नापास झालो नाही, पण मी शिक्षण मंत्री झालो, असं पवारांनी सांगितलं.

मराठवाडा मागासलेला म्हणणं मला आवडत नाही. मराठवाडाची तरुण पिढी कर्तृत्ववान आहे. हुशार, कर्तृत्ववान फक्त मुंबई आणि पुण्यातच आहेत असं नाही. कर्तृत्ववान पिढी इथेही आहे. फक्त त्यांना प्रोत्साहन दिले गेले पाहिजे, असं शरद पवार म्हणाले.

एमजीएमची शिक्षण संस्था  नवी मुंबई आणि दिल्लीलाही आहे. त्याचा त्रास आम्हला होतो. कारण अॅडमिशन मिळवण्यासाठी जून-जुलै महिन्यात आम्हाला त्रास देतात. फार चांगलं चालवलं म्हणून आम्हाला त्रास होतो, असं कौतुक करताना, शरद पवारांनी ही संस्था अशीच पुढे चालत राहो, अशा शुभेच्छा दिल्या.