कोल्हापूर : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याला आता बरेच दिवस लोटलेत. पण त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद आजही पाहायला मिळत आहेत. अशात कोश्यारी यांनी काल पुन्हा एकदा एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. विरोधक त्यावर टीकाकरताना पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज या वादावर पुन्हा एकदा भाष्य केलंय. त्यांनी कोश्यारी यांच्या विधानावर टीका केलीय. ते कोल्हापुरात बोलत होते.
भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपालपदाची प्रतिष्ठा राखावी. आधीचे राज्यपाल चांगले होते. आताचे राज्यपाल सतत वादग्रस्त वक्तव्य करतात, असं म्हणत शरद पवार यांनी कोश्यारींच्या त्या वादग्रस्त वक्तव्यावर टीका केली आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी पुणे दौऱ्यावर असताना एका कार्यक्रमात ते भाषण करत होते. भाषण सुरु होताच एका महिलेने उभं राहून राज्यपाल कोश्यारी यांचे भाषण थांबवलं.‘राज्यपालजी तुम्ही आम्हाला दिसत नाहीत‘ असं म्हणत आपली अडचण सांगितली. महिलेच्या बोलण्यानंतर भगतसिंग कोश्यारी यांनी त्याला उत्तर दिलं. ‘मैं मानता ही नही हूं की मैं राज्यपाल हू…आप जैसा बोलोगी वैसा मैं करूंगा, बोलो!’ असं कोश्यारी म्हणाले. त्यानंतर त्यांच्या या वक्तव्यावर जोरदार टीका होत आहे.
जातीयवादाचा विचार आमच्या मनात नाही. शाहू, फुले, आंबडेकर यांच्या विचारांची आम्ही माणसं आहोत. छत्रपती संभाजी महाराज यांना स्वराज्य रक्षक म्हणणं फारसं चुकीचं नाही. यावरून वाद निर्माण होणं चुकीचं आहे, असंही शरद पवार म्हणालेत.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत एक विधान केलं. छत्रपती संभाजी महाराज हे धर्मरक्षक नव्हते तर ते स्वराज्य रक्षक होते, असं अजित पवारांनी म्हटलं. त्यावर शरद पवार यांनी भाष्य केलंय.
जातीनिहाय जनगणना व्हावी, अशी आमची या आधीपासून मागणी आहे. यामुळे लहान घटकांची मोजदाद होईल. नितीश कुमार यांनी घेतलेल्या भूमिकेचे स्वागत आहे, असंही पवार म्हणालेत.