कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते राष्ट्रवादीचे खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक आणि काँग्रेस आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांचं मनोमिलन करतील अशी आशा होती. मात्र सतेज पाटील हे आऊट ऑफ कोल्हापूर असल्याने या दोघांत समेट होणं आता जवळपास अशक्य झालं आहे.
त्यामुळे आजच्या दौऱ्यात शरद पवार डॅमेज कंट्रोल करणार की नवी रणनीती आखणार? याबाबत उत्सुकता लागली आहे. शरद पवारांच्या उपस्थितीत आज कोल्हापुरात आघाडीच्या नेत्यांचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात बंटी-मुन्ना यांचं मनोमिलन होईल अशी अपेक्षा होती, मात्र ती आता मावळली आहे.
सतेज पाटील आणि धनंजय महाडिक हे एकमेकांचे हाडवैरी आहेत. लोकसभा निवडणुकीत सतेज पाटील यांनी धनंजय महाडिक यांना मदत केली होती. मात्र विधानसभा निवडणुकीत सतेज पाटील यांना पाडण्यासाठी धनंजय महाडिक यांनी प्रयत्न केले. त्यामुळे बंटी-मुन्ना वाद टोकाला पोहोचला आहे.
मुन्नांचा फॉर्म भरण्यास बंटींची गैरहजेरी
दरम्यान, काल धनंजय महाडिक यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. मात्र यावेळीही सतेज उर्फ बंटी पाटील अनुपस्थितीत राहिले. राष्ट्रवादीच्या नेत्या कार्यकर्त्यांनी सतेज पाटील यांना त्यांच्या घरी जाऊन निमंत्रण दिलं होतं. मात्र धनंजय महाडिक हे स्वत: त्यांना निमंत्रण देण्यास गेले नव्हते.
मदत नाही तर विरोधही नको – महाडिक
“काँग्रेस आमदार सतेज पाटील स्वतःला राहुल गांधीपेक्षा मोठे समजतात. मला मदत नाही केली तरी ठीक आहे, पण त्यांनी विरोध करायला नको होता”, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूरचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी म्हटलं. धनंजय महाडिक यांनी काल आपला उमेदवारी अर्ज भरला. त्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
कोल्हापूर लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून धनंजय महाडिक तर शिवसेनेकडून संजय मंडलिक यांच्यात लढत होत आहे. मात्र काँग्रेसचे सतेज पाटील यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी धनंजय महाडिक प्रयत्नशील आहे. पण विधानसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांचे चुलतबंधू अमल महाडिक यांनी सतेज पाटील यांचा पराभव केल्याने, ते खवळले आहेत.
संबंधित बातम्या
मदत नाही तर नाही, विरोध तर करु नका, धनंजय महाडिक हतबल
VIDEO : एक बार मैने डिसिजन लिया, तो मैं किसीं की नहीं सुनता : सतेज पाटील
ज्यांच्या मनधरणीसाठी जयंत पाटील कोल्हापुरात, ते सतेज पाटीलच जिल्ह्याबाहेर!