नाशिक : राष्ट्रवादीमध्ये बंड करून बाहेर पडलेले अजित पवार यांच्यासोबत जाणाऱ्या आमदारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्याचवेळी शरद पवार यांच्या गटाकडून अजित दादा यांच्या गटात असलेल्या आमदारांना परत येण्यासाठी संदेश पाठविण्यात येत आहेत. परंतु, अजित दादा यांच्याकडील आमदारांना पुन्हा आपल्या गटात खेचण्यासाठी शरद पवार गटाला म्हणावे तितके यश मिळताना दिसत नाही. अकोल्याचे आमदार किरण लहामटे यांच्यापाठोपाठ आता आणखी एका तटस्थ महिला आमदाराने आपला निर्णय जाहीर केला आहे. इतकंच नव्हे तर या आमदार आज नाशिक येथे अजित पवार यांच्या स्वागताला हजर होत्या. त्यांच्या या भूमिकेमुळे अजितदादा यांची ताकद वाढत असल्याचे दिसत आहे.
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरु होत आहे. या अधिवेशनात दोन्ही गटांना आपली ताकद दाखवावी लागणार आहे. त्यावरच करी राष्ट्रवादी कुणाची याचा निर्णय होणार आहे. त्यामुळे दोन्ही गट आपली ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, या स्पर्धेत अजितदादा गटाचे पारडे अधिकाधिक जड होत आहे.
अकोला मतदारसंघाचे आमदार किरण लहामटे यांनी गुरुवारी आपला निर्णय जाहीर करताना भावनिक होऊन शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. पण, मतदारसंघात निधी मिळाला नाही, जनतेची कामे झाली नाही तर जनता मला जाब विचारेल असे सांगत त्यांनी आपण अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला असे म्हटले होते.
आमदार लहामटे यांच्यानंतर आता नाशिकमधील देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे. नाशिकमध्ये ‘शासन आपल्या दारे’ या उपक्रमासाठी अजित पवार नाशिकमध्ये पोहोचले. यावेळी सरोज अहिरे यांनी अजित दादांचे स्वागत केले.
शरद पवार हे मोठे नेते आहेत. ते मला वडिलांसारखे आहेत. तर, अजितदादा यांनी मला भावासारखे प्रेम दिले. त्यामुळे मनस्थिती द्विधा होती. पण, मतदारसंघात चर्चा करून अजित दादा यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला असे त्या म्हणाल्या.
मतदारसंघाचा विकास खुंटला आहे. अनेक विकास कामे थांबली आहेत. या कामांना गती मिळण्यासाठी सत्तेत राहणे आवश्यक आहे. त्यामुळे मतदारसंघातील नागरिकांशी चर्चा करूनच हा निर्णय घेतला असे त्या म्हणाल्या.