मुंबई : काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांनी लिहिलेल्या ‘विधानगाथा’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला मुंबईतील विधानभवनात दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुकही केलं. तर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही व्यासपीठावरच मुख्यमंत्र्यांसमोर भाजपला टोला लगावला. विधीमंडळात येणाऱ्या नव्या सदस्यांना मार्गदर्शक ठरेल असे हे पुस्तक असल्याची प्रतिक्रिया शरद पवारांनी (Sharad pawar) दिली.
देशाच्या संसदेने, राज्याच्या विधीमंडळाने याआधी अनेक अभ्यासपूर्ण भाषणे ऐकली आहेत. शेकाप नेते उद्धवराव पाटील, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस विषयाची चांगली तयारी करून मांडणी करत. सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही अभ्यासपूर्वक मांडणी करतात, अशा शब्दात अनेक वर्षांच्या संसदीय कामकाजाचा अनुभव असलेल्या पवारांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं.
दरम्यान, या भाषणात शरद पवारांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीच्या अगोदरची एक आठवणही सांगितली. मी या विधीमंडळात प्रेक्षक म्हणून पहिल्यांदा आलो होतो. प्रेक्षकांच्या गॅलरीत मी पायावर पाय ठेवून बसलो असता कर्मचाऱ्यांनी हाटकलं आणि बाहेर काढलं. बाहेर जाताक्षणी मी शपथ घेतली की, आता बाहेर जाईन, पण पुन्हा इथे येईन.. आणि नंतर आमदार होऊन मी विधीमंडळात आलो, असं शरद पवार म्हणाले.
हल्ली सभागृहात वेगळाच पायंडा पाडला जात आहे. माझ्या संसदीय आणि विधीमंडळातील 52 वर्षांच्या कार्यकाळात मी कधीही माझा बाक सोडला नाही. संसदेची गरीमा सांभाळण्याची काळजी आम्ही घेतली. दुर्दैवाने आज तसे होताना दिसत नाही, असं म्हणत सध्याच्या विधीमंडळ आणि संसदीय कामकाजावरही शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली.
अशोक चव्हाणांचा मुख्यमंत्र्यांना टोला
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला. हर्षवर्धन पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्यावर अप्रत्यक्षपणे अशोक चव्हाणांनी भाष्य केलं. कुठलाही संसदीय कार्यमंत्री हा मुख्यमंत्र्यांचा विश्वासू असतो अशी प्रथा आहे. पण आता काय प्रथा आहे हे काही माहीत नाही. हर्षवर्धन पाटील लवकरत सभागृहात यावे ही आमची इच्छा आहे. येतीलही, कारण मुख्यमंत्र्यांच्या बाजूला बसले आहेत आणि गिरीश महाजन समोर आहेत, असा टोला त्यांनी लगावला.