मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar Bhima Koregaon) यांनी आज पत्रकार परिषद घेत भीमा कोरेगाव तपासाबाबत भाष्य केलं. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही उपस्थित होते. शरद पवार (Sharad Pawar Bhima Koregaon) यांच्या पत्रकार परिषदेपूर्वी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांची घरी जाऊन भेट घेतली.
शरद पवार म्हणाले, “भीमा कोरेगाव-एल्गार याबाबत मी माझी मतं व्यक्त केली. यामध्ये एक बाब आहे की कोरेगाव-भीमा हा वेगळा कार्यक्रम आहे. कोरेगाव भीमा, एल्गार संदर्भात चर्चा होतेय. त्यात उलटसुलट चर्चा होत आहे. कोरेगाव भीमा हा कार्यक्रम वेगळा कार्यक्रम आहे. तो गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. स्तंभाला अभिवादन त्या ठिकाणी केले जाते”.
दरवर्षी लोक जमतात आणि विजय स्तंभाला अभिवादन करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तिथे जाऊन आल्यानंतर तिथे जाणाऱ्यांची संख्या वाढली. संभाजी भिडे यांनी त्या ठिकाणी एक वेगळे वातावरण निर्माण केलं गेलं. त्यात नक्की काय झालं ते चौकशीत बाहेर येईल, असं शरद पवार म्हणाले.
“आजूबाजूच्या गावांमध्ये संभाजी भिडे आणि काही जणांनी वेगळं वातावरण निर्माण केलं. संभाजी महाराजांची समाधी उद्ध्वस्त करण्यात आली. त्याचा परिणाम संघर्षात झाला. त्यामागे काय वस्तूस्थिती आहे, ते आज ना उद्या बाहेर येईल”, असं पवारांनी नमूद केलं.
एल्गार परिषद ही वेगळी आहे. कोरेगाव भीमाशी तिचा संबंध नव्हता. एल्गार परिषद त्याच्या काही दिवस आधी झाली होती. शंभरपेक्षा जास्त संघटना परिषदेत सहभागी झाल्या होत्या. अध्यक्षपद नि. न्यायमूर्ती पी बी सावंत करणार होते. परंतु ते येऊ शकले नाहीत.
एल्गार परिषदेशी संबंध नसलेल्या, हजर नसलेल्या लोकांवर खटले भरले गेले. नामदेव ढसाळ यांच्या गोलपीठा हा प्रसिद्ध काव्यसंग्रह, त्याला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार आहे. त्यातील एक कविता अत्याचाराविरुद्ध भावना व्यक्त करते. ‘रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो, तुमची आय-बहीण आजही विटंबली जाते’ ही कविता वाचल्याने सुधीर ढवळेंवर कारवाई केली, असं शरद पवार म्हणाले.
ढसाळ यांच्या कवितेतून संताप व्यक्त केला आहे. याचा अर्थ लगेच आग लावा असा होत नाही. या कवितेच्या आधारानं लोकांना तुरुंगात टाकायचे हे योग्य नाही. या लोकांवरच्या अन्यायातून कशी सुटका करायची याचा माझा प्रयत्न आहे, असं शरद पवारांनी नमूद केलं.
सुप्रीम कोर्टात या लोकांना जामीन मिळाला. मात्र गेल्या राज्य सरकारनं जी माहिती ठेवली त्यामुळं त्यांना जामीन मिळाला नाही.
याप्रकरणात त्यावेळच्या पोलीस अधिकाऱ्यांनी संशयास्पद भूमिका घेतली. पुणे पोलिसांतील त्यावेळच्या अधिकाऱ्यांचं वर्तन संशयास्पद आहे. पोलिसांनी सरकारच्या संगनमताने काम केलं. सत्य काय आहे ते लोकांसमोर आलं पाहिजे. आमची पोलिसांच्या वर्तनाविरोधात तक्रार आहे. पोलीस आणि तत्कालिन सरकारमधील लोकांची चौकशी व्हावी ही आमची मागणी आहे, असं शरद पवार म्हणाले.
गृहमंत्री अनिल देशमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा विषय समजून घेण्याचा प्रयत्न केला. तपासाचा निर्णय झाला आणि दोन तासात केंद्राचा मेसेज आला की तपास एनआयएकडे हँडओव्हर करा. आता ही माहिती केंद्राला कोणी दिली? एकतर अजित पवार किंवा अनिल देशमुख. पण त्या दोघांनी सांगितलं की आमचं केंद्राशी काहीही बोलणं झालेलं नाही. याचा अर्थ तिथे उपस्थित अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली, असा दावा शरद पवार यांनी केला.
राज्य सरकारने काय करायचं ते करावं, मी काही त्यात हस्तक्षेप करणार नाही, पण मला ही गोष्ट लोकांसमोर आणायची होती, असं पवार म्हणाले.
भीमा कोरेगाव प्रकरणात चौकशीची मागणी नाही, एल्गार परिषद प्रकरणात पोलिस दलाने ज्या प्रकारे सत्तेचा गैरवापर केला, त्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी शरद पवारांनी केली.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळीच सिंधुदुर्गात पत्रकार परिषद घेतली. “एल्गार परिषद आणि भीमा कोरेगाव हे दोन्ही वेगवेगळे विषय आहेत. दलित बांधवांशी संबंधित जो विषय आहे तो भीमा कोरेगावचा आहे. या प्रकरणाचा तपास केंद्राला दिलेला नाही आणि देणारही नाही”, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray on Bhima Koregaon and elgar parishad) यांनी दिलं. ते सिंधुदुर्गात बोलत होते. एल्गार परिषद हा विषय वेगळा आहे. केंद्राने एल्गार प्रकरणाचा तपास काढून घेतला आहे. मात्र भीमा कोरेगाव हा विषय वेगळा आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
संबंधित बातम्या
भीमा कोरेगावचा तपास केंद्राला दिलेला नाही आणि देणारही नाही : उद्धव ठाकरे