मुंबई : महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळाप्रकरणी ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar Press conference ) यांनी आज पत्रकार परिषद घेतली. शरद पवार आजच्या पत्रकार परिषदेत काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.
ही छोटी पत्रकार परिषद आहे असं पवार म्हणाले. काल संध्याकाळपासून टीव्हीवरून माहिती माझ्या कानावर आली. ईडीने शिखर बँकेबाबत माझ्याविरोधात खटला दाखल केला यात माझं नाव आहे हे समजलं, असं शरद पवारांनी सांगितलं.
“काल संध्याकाळपासून माहिती मिळत आहे की शिखर बँकेच्या तथाकथित भ्रष्टाचारा प्रकरणी माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. माझ्या आयुष्यातली ही दुसरी घटना आहे. 1980 साली जेव्हा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जळगाव ते मुंबई असा मोर्चा काढला होता तेव्हा आम्हाला अटक झाली होती. त्यानंतर माझ्यावर गुन्हा दाखल झाला होता. आता हे दुसरे प्रकरण आहे”, असं शरद पवार म्हणाले.
महाराष्ट्र हे शिवछत्रपतींचं राज्य आहे. या राज्यावर त्यांचे संस्कार आहेत. त्यामुळे दिल्लीच्या तख्तासमोर झुकण्याचा संस्कार शिकवलेला नाही, असं पवारांनी ठणकावलं.
“मी तपास यंत्रणेला पूर्ण सहकार्य करणार आहे. मला निवडणूक प्रचारासाठी वेळही द्यावा लागणार आहे. प्रचारासाठी मला मुंबईच्या बाहेर राहावे लागेल. ईडीला मला प्रेमाचा संदेश पाठवायचा असेल, त्यामुळे ईडीला असं वाटयाला नको की मी अदृश्य ठिकाणी आहे. त्यामुळे शुक्रवारी 27 रोजी 2 वाजता मी स्वतः ईडीच्या ऑफिसला जाणार आहे. ईडीला हवी असलेली माहिती देईन आणि अन्य पाहुणचारासाठी ही माझी तयारी आहे”, असं पवारांनी सांगितलं.
“मी एक महिनाभर निवडणुकीसाठी बाहेर असेन म्हणून आज तुम्हाला (पत्रकारांना) भेटलो आहे. 27 सप्टेंबरला ईडीच्या ऑफि मध्ये मी स्वतः जाणार आहे. अधिकाऱ्यांना जी माहिती पाहिजे ती देईन. जर काही पाऊणचार असेल तो पण स्वीकारेन”, असं शरद पवार म्हणाले.
शुक्रवारी 27 सप्टेंबरला दुपारी दोन वाजता ईडीच्या कार्यालयात मी स्वतः जाणार, आवश्यक माहिती तर देणारच पण आवश्यक पाहुणचार स्वीकारण्याचीही तयारी – शरद पवार
मी महात्मा फुले, शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर अस्था ठेवणारा व्यक्ती आहे. संविधानबाबत मला आदर आहे. त्यामुळे मी सहकार्य करणार. पण एक सांगतो हा महाराष्ट्र शिवबांचा महाराष्ट्र आहे. दिल्लीच्या तख्तावर झुकणे महाराष्ट्राने शिकवले नाही
राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर अनेक पक्षाचे लोक होते, पण मी कधीही संचालक मंडळावर नव्हतो. मला आंबेडकरांच्या संविधानावर विश्वास आहे. या महाराष्ट्रावर छत्रपती शिवरायांचे संस्कार आहेत, असं शरद पवार म्हणाले.
राज्यभरातील आमच्या यात्रांना मिळालेला प्रतिसाद पाहून ही कारवाई असेल अशी शंका आहे, असं शरद पवारांनी नमूद केलं.
ईडीची अधिकृत प्रत माझ्या वाचनात आलेली आहे, त्यामुळे ईडीला सहकार्य करणं माझं कर्तव्य. निवडणूक काळात असं केलं जातं आहे का हे लोकांना माहीत आहे. माझं पुढील पाऊल ईडीच्या ऑफिसमध्ये जाणं आणि त्यांचा पाऊणचार स्वीकारणे हेच आहे, असं पवार म्हणाले.