Sharad Pawar On Vidhansabha Seats Distribution : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोमाने तयारीला लागले आहेत. काही दिवसांपूर्वी भाजपने पुण्यातून विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलं. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक मेळावा आयोजित करुन कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आदेश दिले. त्यातच आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते शरद पवार यांनी महाविकासआघाडीचे येत्या विधानसभा निवडणुकीसाठीचे रणनिती कशी असेल याबद्दलची माहिती दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाविकासआघाडी आणि महायुती या दोन्हीही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची खलबतं पाहायला मिळत आहे. सध्या मुंबई, पुणे, नवी दिल्ली अशा ठिकठिकाणी वरिष्ठ नेत्यांच्या बैठका पार पडताना दिसत आहेत. या बैठकांमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये कोणाला किती जागा मिळणार, त्यांची विभागणी कशी केली जाणार, कोणती जागा कोणाला दिली जावी, कोण कोणत्या जागेसाठी इच्छुक आहे, याबद्दलच्या चर्चा पाहायला मिळत आहे.
त्यात आता शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेवेळी बोलताना शरद पवारांनी महाविकासआघाडीतील घटक पक्षांचे विधानसभा निवडणुकीसाठीचे जागा वाटप कसे आणि कोणत्या निकषाद्वारे होईल, याबद्दलची माहिती दिली.
गेल्या तीन दिवसांपूर्वी आमची चर्चा झाली. त्यामध्ये शिवसेनेकडून संजय राऊत यांनी तडजोडीसाठी जी समिती करायची त्याची नावे दिली. जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीची नावे दिली. बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांनी काही नावं दिली आहे. त्यांच्या बैठकीची प्रक्रिया १२ तारखेनंतर सुरू होईल. काही झालं तरी जागेचा निर्णय घ्यावा, एकवाक्यता ठेवावी आणि लोकांना पर्याय द्यावा हे तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी ठरवलं आहे. आमचं यावर एकमत आहे, असे शरद पवार म्हणाले.
त्यात मी सुधारणा सूचवली आहे. तीन पक्ष जसे महत्त्वाचे आहेत, तसे डावे पक्ष महत्त्वाचे आहेत. त्यांनी लोकसभा निवडणूक न लढवता आपल्याला सहकार्य केलं. त्यांना काही जागा सोडल्या पाहिजे. आमची चर्चा सुरू होती. तेव्हा याचा अंतिम निर्णय होईल, असे ही शरद पवारांनी यावेळी सांगितले.
“आता विधानसभेच्या निवडणुका आहे. त्या तीन एक राज्याच्या निवडणुका आहेत. लोकांना बदल हवा असल्याचं दिसत आहे. आजच्या राज्यकर्त्यांना आवर घातला पाहिजे. पण आपल्याला विधानसभा निवडणुकीत संधी आहे, असं लोकांना वाटतं. लोकसभेला आम्ही एकसंघ पर्याय दिला होता. विधानसभेसाठी आम्ही प्रक्रिया सुरू केली आहे. आम्ही त्याचा प्रयत्न करत आहोत. त्याला मूर्त स्वरुप आलं पाहिजे. मूर्त स्वरुप आलं तर लोकसभेसारखी स्थिती दिसू शकेल. नाही आलं तर आजचे राज्यकर्त्यांना किंमत मोजावी लागेल. पण लोकसभेसारखा स्पष्ट निकाल लागणार नाही, असं वाटतं”, असे थेट विधानही शरद पवारांनी केले.