मुंबई : कर्नाटकात 22 वर्षांनंतर काँग्रेसला मोठं मताधिक्य मिळालं. काँग्रेसच्या 137 जागा निवडून आल्या आहेत. बहुमत मिळवत काँग्रेसची सत्ता आली. या सगळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा अन् भाजपच्या रणनितीवर काँग्रेसचा जाहीरनामा अन् रॅली भारी पडल्याची चर्चा होतेय. काँग्रेसला हे यश कसं मिळालं याचीवर राजकीय वर्तुळात चर्चा होतेय. यात राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आणि पावसातील सभेचा मोठा वाटा असल्याचं बोललं जात आहे.
राहुल गांधी यांनी भारत जोडा यात्रा केली. यात ते पायी चालत त्यांनी लोकांशी संवाद साधला. जागोजागी सभा घेतल्या. यातील कर्नाटकमध्ये झालेली राहुल गांधींची सभा प्रचंड गाजली. कर्नाटकातील मैसूरमध्ये राहुल गांधी यांची सभा चालू होती. तेव्हा अचानक पाऊस सुरू झाला. “कन्याकुमारीपासून ते काश्मीरपर्यंत ही भारत जोडो यात्रा चालत राहणार आहे. पाऊस येतोय. पण हा पाऊस भारत जोडो यात्रेला रोखू शकणार नाही”, असं राहुल गांधी यांनी या प्रचारसभेवेळी म्हटलं.
राहुल गांधी यांच्या या सभेची भारत जोडो यात्रेदरम्यान चर्चा झाली. शिवाय कर्नाटकचा निकाल लागल्यानंतर जेव्हा काँग्रेस जिंकली तेव्हाही या सभेची लोक आठवण काढत आहेत. काँग्रेसच्या यशात राहुल गांधी यांच्या या पावसातल्या सभेचा मोठा वाटा असल्याचं बोललं जात आहे. राहुल गांधी यांच्या या पावसातील सभेमुळे शरद पवार यांच्याही अशाच एका पावसातील सभेची आठवणं केली जात आहे.
उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला रामराम करत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर साताऱ्यात लोकसभेची पोटनिवडणूक लागली. तिथे श्रीनिवास पाटील यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. अन् श्रीनिवास पाटलांच्या प्रचारासाठी शरद पवार साताऱ्यात गेले. या प्रचार सभेवेळी अचानक पाऊस आला. भर पावसातही शरद पवार यांनी आपलं भाषणं थांबवलं नाही. ते बोलत राहिले. शरद पवार यांनी भर पावसात भाषण केलं. अन् या पावसाची महाराष्ट्रासह देशात चर्चा झाली. या निवडणुकीत श्रीनिवास पाटलांचा विजय झाला. यात शरद पवार यांच्या पावसातील सभेचा मोठा वाटा असल्याचं बोललं जातं.
आता काँग्रेसच्या कर्नाटकातील विजयानंतर राहुल गांधी यांच्या पावसातील सभेची आणि शरद पवार यांच्या पावसातील सभेची आठवण लोक काढत आहेत. त्यामुळे पावसातील सभा अन् निवडणुकीतील विजय यांचं जवळचं समिकरण असल्याची चर्चा सोशल मीडियावर होतेय.