साहेब, दादा एकत्र दिसणार? आमदारांच्या आर्त सादेला नेते प्रतिसाद देणार का?

| Updated on: Jul 22, 2024 | 8:40 PM

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजितदादा गटातील दोन आमदारांनी एकापाठोपाठ एक मोठे विधान केले. त्यामुळे आगामी काळात साहेब आणि दादा पुन्हा एकत्र येणार का? आमदारांच्या सादेला हे नेते प्रतिसाद देणार का? याची चर्चा राजकारणात होत आहे.

साहेब, दादा एकत्र दिसणार? आमदारांच्या आर्त सादेला नेते प्रतिसाद देणार का?
sharad pawar and ajit pawar (2)
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून बंड करून बाहेर पडलेले अजितदादा गटाच्या दोन आमदारांनी मोठे विधान केले आहे. त्यांच्या या विधानाची राजकारणात चर्चा होत आहे. अजितदादा यांच्या जवळचे आणि दादांचा बालेकिल्ला पुण्यातीलच हे दोन्ही आमदार आहेत. त्यामुळे त्यांच्या विधानाला विशेष महत्व आहे. जुन्नरचे आमदार अतुल बेनके आणि आता पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी शरद पवार यांच्याशी हातमिळवणी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दोन दिवसांमध्ये अजित दादा यांच्या बालेकिल्ल्यातील या दोन निष्ठावान आमदारांनी घरवापसीबाबत वक्तव्ये केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मात्र, या आमदारांच्या सादेला साहेब आणि दादा प्रतिसाद देतात का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाण यांच्यासह राष्ट्रवादीच्या 20 नगरसेवकांनी नुकताच शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला. या पक्षप्रवेशानंतर खासदार अमोल कोल्हे यांच्या घरी अजितदादा गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी शरद पवारअ यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी अद्याप दीड ते दोन महिन्यांचा कालावधी आहे. तोपर्यंत काहीही होऊ शकते असे सांगत काका-पुतणे एकत्र येण्याची शक्यता वर्तविली होती. मात्र, त्याच्या दुसऱ्याच दिवशी अतुल बेनके यांनी अजित पवार यांच्यासोबत पत्रकार परिषद घेऊन आपण त्यांच्यासोबत असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला.

आमदार अतुल बेनके यांच्यासोबत अजित दादा यांचे आणखी एक जवळचे मित्र पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनीही ‘पवार साहेब आणि दादा यांच्या एकत्र येण्याचे मी मनापासून स्वागत करेन. दोघेही महान नेते आहेत. हे दोघे एकत्र आले तर येत्या विधानसभा निवडणुकीत आमचे चित्र नक्कीच बदललेले दिसेल.’ असे मोठे विधान केले.

अजितदादा गटाची अडचण काय?

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये अजितदादा गटाची कामगिरी तशी सुमार होती. जागावाटपातही अजित पवार गटाला झुकते माप देण्यात आले. त्यातुलनेत महाविकास आघाडीमध्ये शरद पवार यांनी अधिक जागा मिळवून त्या जिंकूनही आणल्या. निवडणुकीतील या यशापशानंतर अजितदादा यांना एनडीएच्या मित्रपक्षांकडूनच लक्ष्य करण्यात आले. लोकसभेतील पराभवानंतर आरएसएसने थेट अजित पवारांनाच जबाबदार धरले. शिवसेना (शिंदे गट) नेते रामदास कदम यांनीही अजित पवारांवर निशाणा साधला. तर, भाजप आमदार सुरेश धस यांनीही अजित पवारांवर उघड टीका केली. भाजपच्या अंतर्गत बैठकांमध्येही अजित पवार यांच्याविरोधात सूर उमटत आहे. तर, शरद पवार यांचे महाविकास आघाडीतील स्थान अधिकच भक्कम झाले आहे.

शरद पवार यांच्या रणनीतीमुळे राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज उमेदवार लोकसभेत पराभूत झाले. त्यामुळे अजितदादांना पाठिंबा देणारे आमदार विधानसभा निवडणुकीसाठी घाबरले आहेत. पुणे हा अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जात असला तरी शरद पवारांनी या बालेकिल्ल्यावर आपले लक्ष केंद्रीत केल आहे. त्यामुळे अजितदादा गटातील आमदारांची धडधड आणखीनच वाढली आहे. अनेक आमदार नाराज असल्याचे दिसत आहे.

महायुतीमधील घटकपक्षाच्या नेत्यांनी, आमदारांनी अजितदादा यांच्यावर केलेली टीका दादागटाच्या आमदारांच्या जिव्हारी लागली आहे. तर, केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. अशावेळी या दोन्ही नेत्यांची होणारी मानहानी या आमदारांना सहन होण्यासारखी नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी या दोन्ही नेत्यांनी पुन्हा एकत्र यावे अशी साद हे आमदार घालताना दिसत आहेत. त्यांचे हे विधान नक्कीच हलक्यात घेण्यासारखे नाही. मात्र, शरद पवार यांनी ज्यांना परत यायचे असेल त्यांच्याबाबतचा निर्णय वाईट काळात सोबत असलेल्यांना विश्वासात घेऊनच घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या आमदारांचा हाकेला शरद पवार आणि अजितदादा काय प्रतिसाद देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.