नाशिक : अनेक हुतात्म्यांच्या त्यागानंतर ही मुंबई महाराष्ट्राला मिळाली आहे आणि त्या मुंबईबद्दल राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोशारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी एक वादग्रस्त विधान केलं. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या (NCP) वतीने राज्यभर राज्यपाला विरोधात आंदोलन सुरू झाली आहेत. या राज्यपालांनी पायउतार व्हावं हे, राज्यपाल नाही भाज्यपाल आहेत, अशी जहाल टिका राष्ट्रवादीकडून होऊ लागली आहे. त्यातच आता राज्यपालांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. शरद पवार यांनी त्यांच्या स्टाईलने राज्यपालांच्या या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे. तसेच राज्यपालांच्या टोपीचा रंग आणि त्यांच्या अंतःकरणाचा रंग एकच असल्याचा घणघात शरद पवारांनी केला आहे. दुसरीकडे राज्यभरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राज्यपालांविरोधात रस्त्यावर उतरत आक्रमक आंदोलन करत आहेत. त्यामुळे राज्यपालांच्या एका विधानाने राज्यातलं राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालंय.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज नाशिक दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांना राज्यपालांच्या विधानाबाबत विचारले असता ते म्हणाले, या राज्यपालांच्या बद्दल काय बोलण्यासारखं उरलेच नाही. यांच्याबद्दल काय बोलायचं हे सांगणं कठीण झालं आहे. याच्या आधी यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल असेच एक भयानक स्टेटमेंट केलं होतं. सावित्रीबाई फुले यांच्या बद्दलही राज्यपालांचे स्टेटमेंट भयानक होतं. आता एक त्यांचं एक वेगळ्या पद्धतीचं वक्तव्य आलेलं आहे, असे पवार म्हणाले.
तसेच महाराष्ट्र किंवा मुंबई सर्व जातीच्या धर्माच्या लोकांना घेऊन जाणारे हे राज्य आहे. असे असताना तिथं जे काय मुंबईची प्रगती झाली ती सर्व सामान्य माणसाच्या कष्टातून झाली, घामातून झाली आणि असं असताना अशा प्रकारची विधानं करणं हे काही शहाणपणाचे लक्षण नाही. मी त्याच्या फार खोलत जात नाही. कारण राज्यपालांच्या डोक्यावरच्या टोपीचा रंग आणि त्यांच्या अंतःकरणाचा रंग याच्यात काही फारसा फरक नाही. यावरती आणखी जास्त बोलण्याची काही गरज नाही, असा टोला शरद पवारांनी राज्यपालांना लगावला आहे.
“मुंबई, ठाण्यासह अखंड महाराष्ट्र मराठी माणसांनी घडवला आहे. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची महाराष्ट्राची संस्कृती, इतिहास आहे. महाराष्ट्र एकसंध, एकजूट आहे. महामहीम राज्यपाल महोदयांनी अनावश्यक वक्तव्ये टाळावीत. महाराष्ट्रात वाद निर्माण करू नये. महाराष्ट्राविना राष्ट्रगाडा न चाले हे लक्षात ठेवावे… खरा वीर वैरी पराधीनतेचा।
महाराष्ट्र आधार या राष्ट्राचा।।” अशी प्रतिक्रिया यावर अजित पवारांनी दिली आहे.
तर दुसरीकडे आम्ही राज्यपालांच्या वक्तव्याचं समर्थन करत नाही, असे मुख्यमंत्री आणि भाजपकडून स्पष्ट करण्यात आलंय. सोमवारी मुख्यमंत्री परत येतील तेव्हा ते राज्यपालांना भेटतील आणि यावर चर्चा होईल, अशी माहिती शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी दिली आहे.