पुणे : भाजप-शिवसेनेत मुख्यमंत्रीपदावरून (CM Post dispute in BJP Shivsena) ‘तू तू मैं मैं’ सुरू आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शिवसेनेने ऐनवेळी आज (29 ऑक्टोबर) भाजपसोबत होणारी बैठक देखील रद्द केली. भाजप-शिवसेनेत कलगीतुरा सुरू असल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीचं (Congress NCP roll in Government Formation) राजकीय महत्त्व वाढलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दिवाळी आटपून खासदार सुप्रिया सुळेंसोबत बारामतीहून मुंबईकडे रवाना झाले आहेत.
शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या व्यतिरिक्त राष्ट्रवादीचे नेते अजित पवार देखील रात्री मुंबईत दाखल होणार आहेत. तसेच कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार देखील बुधवारी (30 ऑक्टोबर) मुंबईत येणार आहेत. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. आता राज्यात सत्तास्थापनेची गणितं कशी बदलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.
शरद पवार यांनी आपल्याला शिवसेनेकडून कोणताही प्रस्ताव आला नसल्याचं म्हणत आपण विरोधीपक्षाची भूमिका पार पाडणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर अनेक नेत्यांकडून शिवसेनेला पाठिंबा देण्याची अप्रत्यक्ष विधाने केली जात आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी देखील शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिलेली आहे. अशातच पवार कुटुंबीय मुंबईत दाखल होत आहेत. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देखील शरद पवार यांना फोन करुन राजकीय घडामोडींवर चर्चा केली आहे. त्यामुळे राज्यात कुणाचं सरकार स्थापन होणार आणि कोण मुख्यमंत्री होणार याविषयी कमालीची उत्सुकता ताणली जात आहे.
संबंधित बातम्या:
साताऱ्याच्या गादीचा आदर ठेवला नाही, जनतेने कौल दिला : शरद पवार
पावसातील भाषण ते शिवसेनेच्या मुख्यमंत्रिपदाबाबत, शरद पवारांची रोखठोक भूमिका