सातारा : मतदारसंघातील कामं होत नसल्याचं सांगत शिवेंद्रराजे भोसलेंनी पक्षांतर केलं, तर भ्रष्टाचारविरोधी प्रकरणातील केसेसना तोंड देणं अशक्य झाल्याचं सांगत चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला, असा दावा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत पवार बोलत होते.
साताऱ्याची जागा राष्ट्रवादीच लढवणार असल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. आतापर्यंत तीन अर्ज आल्याचंही त्यांनी सांगितलं.
शिवेंद्रराजे यांच्या भाजपप्रवेशावर शरद पवारांनी सावध प्रतिक्रिया दिली. शिवेंद्रराजे जाणार नाहीत असं म्हणाले होते. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्यासोबत एक बैठक करण्याची त्यांची इच्छा होती, पण ते आधीच गेले, असंही पवार म्हणाले.
दोन्ही राजेंमधील संघर्ष हे पक्षप्रवेशाचं कारण नाही, हे शिवेंद्रराजेंनी सांगितलं आहे. मतदारसंघातील कामं होत नाहीत, हे कारण असल्याचा खुलासा त्यांनीच केल्याचं शरद पवार म्हणाले.
आमचे तीन नेते गेले. त्यांनी मतदारसंघातील कामं होत नसल्याचं कारण दिलं. म्हणजेच, ज्यांच्या हातात राज्य आहे, ते लोकप्रतिनिधींच्या रास्त खर्चाकडे लक्ष देत नाहीत किंवा जाणीवपूर्वक सूडबुद्धीने वागतात, असा याचा अर्थ होत असल्याचंही पवार म्हणाले.
चित्रा वाघ यांच्या संस्थेशी संबंधित दोन फाईल भ्रष्टाचारविरोधी विभागाकडे आहेत. त्यांच्या पतीच्या करप्शन केसबाबत आरोपपत्र दाखल आहे. त्यांना या प्रकरणात तोंड देणं अशक्य झालं आहे. म्हणून आपण पक्ष सोडत असल्याचं चित्रा वाघ यांनी सांगितल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.
शरद पवार यांनी तीन तलाक प्रकरणात तीन वर्षांची शिक्षा अयोग्य असल्याचं मत व्यक्त केलं. त्या कुटुंबाकडे कोण पाहणार, असा सवाल उपस्थित केला. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने आधीच या मुद्द्याला विरोध केला असल्याचंही पवार म्हणाले.
‘भाजपमध्ये मेगाभरती’ सुरु असल्याच्या चर्चांवर, आमचे तीनच जण गेले आहेत, याला मेगाभरती म्हणायचं का? असा प्रश्न पवारांनी विचारला. ‘राज्य सरकारने लाखो तरुणांना नोकरी लागेल, असं सांगितलं होतं. मात्र तसं झालं नाही. बोटावर मोजण्याइतक्या तरुणांची भरती झाली. ही भरतीसुद्धा तशीच आहे, असं शरद पवार म्हणाले.
भाजपमध्ये मेगाभरती
शरद पवारांचे कट्टर समर्थक आणि राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य मधुकर पिचड, त्यांचे सुपुत्र वैभव पिचड (Vaibhav Pichad), साताऱ्याचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendra Raje Bhonsle), मुंबईच्या वडाळा येथील काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर (Kalidas Kolambkar), नवी मुंबईचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक (Sandeep Naik) आणि राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.