मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत असूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला जाणं टाळलं होतं. त्यांना पाचव्या रांगेत स्थान दिल्यामुळे ते गेले नाही, असाही दावा करण्यात आला होता. यामुळे पवारांचा अपमान झाल्याचाही आरोप करण्यात आला. पण पवारांना दिलेल्या निमंत्रण पत्रिकेनुसार, त्यांना पहिल्या रांगेत स्थान देण्यात आलं होतं.
पवार यांना पाचव्या रांगेत स्थान दिल्यामुळे पवार यांचा सरकारने अपमान केला आहे असा समज होता. पण शरद पवार यांना शपथविधी समारंभाला पहिल्याच रांगेत स्थान दिलं होतं. शरद पवार यांना पाठवलेल्या निमंत्रण पत्रात V रो स्पष्ट लिहिलं होतं. V रो ही पाचवी लाइन नसून V कोर्ट होतं. तर शरद पवार यांनी आपल्याला पाचव्य रांगेत स्थान दिलंय, असं समजून कार्यक्रमाला जाणं टाळल्याचं बोललं जातंय. पवारांनी स्वतःहून न जाण्यामागचं कारण अजूनही सांगितलेलं नाही.
पंतप्रधान मोदींच्या शपथविधीच्या दिवशी म्हणजे 30 मे रोजी शरद पवार हे दिल्लीतच होते. त्या दिवशी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशीही चर्चा केली. विशेष म्हणजे अनेक विरोधी पक्षातील नेते शपथविधीला हजर होते. राहुल गांधी, सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यासह विविध नेत्यांनी शपथविधीला हजेरी लावली होती.
आपण शरद पवारांचं बोट धरुन राजकारणात आलो, असं सांगणाऱ्या मोदींनी प्रचारात पवार कुटुंबावर हल्लाबोल केला होता. यानंतर पवारांनीही टीकेला उत्तर दिलं होतं. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर सडकून टीका केली होती. तर पवारांनी मोदींविरोधात विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठीही पुढाकार घेतला होता.