शरद पवार आणि अजितदादा पुन्हा एकत्र येणार?; शिंदे गटातून पहिली प्रतिक्रिया काय?

| Updated on: Dec 12, 2024 | 1:37 PM

अजित पवार यांनी शरद पवार यांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकारणात शरद पवार आणि अजितदादा एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार आणि अजितदादा पुन्हा एकत्र येणार?; शिंदे गटातून पहिली प्रतिक्रिया काय?
sharad pawar
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचा आज 85 वा वाढदिवस आहे. या निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये 20 मिनिटे चर्चा झाली. काय चर्चा झाली हे गुलदस्त्यात आहे. विशेष म्हणजे दोन्ही नेत्यांनी बऱ्याच महिन्यानंतर एकत्रितपणे चहा, नाश्ता घेतला. त्यामुळे अजितदादा आणि शरद पवार एकत्र येणार असल्याची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. त्यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. भविष्यात काय घडेल काहीच सांगता येत नाही, अशी सूचक प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे अजितदादा आणि शरद पवार एकत्र येण्याच्या चर्चांना अधिकच उधाण आलं आहे.

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया दिली आहे. अजित दादा हे शरद पवार यांना भेटल्याने शिवसेनेची कोंडी होणार नाही. ही कौटुंबिक भेट असेल तर ठिक. पण जाणकार म्हणतात की, शरद पवार आणि अजित पवार येत्या काळात एकत्र येतील. भविष्यात काय घडेल माहीत नाही. पण त्यांना शुभेच्छा. समोरच्याला कंफ्युझ्ड ठेवण्याचा त्यांचा गुण आहे. भविष्यात कोण कुणासोबत जाणार हे पहावं लागेल, असं संजय शिरसाट म्हणाले.

पण शरद पवार कळाले नाही

शरद पवार यांच्याकडे मोठं नेतृत्व गुण आहे. त्यांनी एकखांबी राजकारण फिरवलंय. पण शरद पवार कळाले नाहीत. चांगल्या कामात आणि वाईट कामात शरद पवारांचा हात असतो. शरद पवारांना आमच्या शुभेच्छा. त्यांनी दीपस्तंभाप्रमाणे काम करावं, असं शिरसाट यांनी सांगितलं.

महत्त्व कमी होणार नाही

महायुतीत आमचं महत्व कमी होणार नाही. आम्हाला राष्ट्रवादीपासून कोणताही धोका नाही. ते पक्षासाठी काम करतात. आम्हीही आमच्या पक्षासाठी काम करतो. आमचा आलेख वरचढ आहे. आम्ही लढणारे लोक आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं.

महत्त्वाच्या घडामोडी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा आहेत. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. एकनाथ शिंदे नाराज नाहीत. ते दिल्लीला जाणार नाही. आज संध्याकाळी बैठक होईल. तिथला काय निरोप आहे हे कळेल. खातेवाटप आणि मंत्रिमंडळाचे फॉर्म्युले ठरलेले असावेत. विस्तार होईल. आज संध्याकाळी बैठक होईल. महत्वाची घडामोड उघड होईल, असंही त्यांनी सांगितलं.

शांतता राखा

परभणीत जे घडलं ते दुर्दैवी आहे. या प्रकरणातील माथेफिरू अटकेत आहे. समाजात दुही पसरेल असं कृत्य करू नये. शांतता राखा, परिस्थिती चिघळतेय. राज्यात गुन्हेगारी वाढत असेल तर सरकारही गंभीर आहे. बीडमध्ये जे काही घडलं त्यात सरकार आरोपींवर कठोर कारवाई करणार. कुणाला पाठीशी घालणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.