मुंबई : (Shivsena) शिवसेनेच्या बंडखोर आमदारांमुळे राजकीय उलथा-पालथ झाली आहे. सरकार टिकवून ठेवण्यासाठी महाविकास आघाडी ही न्यायालयीन लढा लढणार आहे. ज्याप्रमाणे (MVA) महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात (Sharad Pawar) शरद पवार हे केंद्रस्थानी होते त्याच प्रमाणे आता सरकार अडचणीत असताना त्यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. राज्यात राजकीय घडामोडींना वेग येत असतानाच रविवारी दुपारी शरद पवार हे दिल्लीकडे रवाना होत आहेत. त्यामुळे राज्याची राजकारणाची सुत्रे आता दिल्लीतून हलणार की आगामी राष्ट्रपती निवडणुकीच्या दृष्टीकोनातून त्यांचा हा दौरा आहे हे पहावे लागणार आहे. मात्र, शिवसेना आमदारांचे बंड हे शरद पवार करणार का थंड हीच चर्चा पुन्हा रंगू लागली आहे.
गेल्या काही दिवसांपासून या राजकीय नाट्यावर उघडपणे प्रतिक्रिया न देणारे शरद पवार हे आता सरकार वाचवण्यासाठी मैदनात उतरले आहेत. यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. यानंतर राष्ट्रवादीच्या आमदारांसोबत बैठक पार पडल्यानंतर महाविकास आघाडीची एकजूट कायम असून सरकार टिकवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. एवढेच नाही तर सरकारमधील तीनही पक्ष हे न्यायालयीन लढा लढणार आहेत. शरद पवार यांच्या सल्ल्यानुसार ह्या घडामोडींना वेग आला आहे.
राज्यातील राजकीय नाट्याबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आतापर्यंत पडद्यामागे होते. पण तीनही पक्षातील नेत्यांच्या बैठकानंतर पुन्हा शरद पवार हे अॅक्शनमोडमध्ये आहेत.आता त्यांच्या सल्ल्यानुसार महाविकास आघाडी हा लढा लढणार आहे. त्याच अनुशंगाने मुंबईत बैठकांचा सिलसिला सुरु असताना शरद पवार हे दिल्लीकडे रवाना होत आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडीच्या अनुशंगाने त्यांचा हा दौरा आहे की आगामी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमुळे हे पहावे लागणार आहे. मात्र, शरद पवार यांच्या भूमिकेमुळे मविआच्या नेत्यांना सरकार टिकणार असा विश्वास वाटत आहे.
शरद पवार आणि सोनिया गांधी या दोघांनीही या लढाई शिवसेनेला शेवटपर्यंत साथ द्यायचं ठरवलंय. त्यामुळे दोन प्रमुख गोष्टी महाविकास आघाडीला यातून करायच्या आहेत. एक तर शिवसेनेला साथ द्यायचीय आणि दुसरं म्हणजे भाजपला सत्तेसाठी दूर ठेवायचंय. जरी सरकार पडलं तरी शिवसेना भाजपसोबत जाणार नाही, याची काळजीदेखील घ्यावी लागणार आहे.