राज्यात गुंतवणूकीसाठी (Investment) अजून पोषक वातावरण निर्मिती झाली पाहिजे. महाराष्ट्रातून वेदांता प्रकल्प (Vedanta Project) गेला तरी आपल्या देशात कुठे तरी हा प्रकल्प होतोय, याचा मला आनंद आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं. पत्राचाळ घोटाळ्यात शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख आल्यानंतर आज पवार यांनी एक पत्रकार परिषद घेतली. तपास यंत्रणेच्या आरोप पत्रात काय उल्लेख आहे आणि राज्य सरकार काय आरोप करतंय, यात तफावत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. तसेच ग्रामपंचायत निवडणुकांमध्येही भाजप आणि शिंदे सरकारकडून जे दावे करण्यात येत आहेत, तेही वेगळे असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं.
वेदांता प्रकल्प गुजरातला गेला, यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले, ‘ महाराष्ट्रात प्रकल्प झाला असता तर मला आनंद झाला असता. त्यासाठी जागाही ठरली होती. नव्या लोकांना काम करण्याची संधी मिळाली असती. देशात कुठे तरी होतोय…
राज्य सरकारने गुंतवणुकीचं वातावरण निर्माण केलं असतं तर बरं झालं असतं… मी काम करत होतो तेव्हा मला गुंतवणूक करायला येणाऱ्या लोकांना आणि त्यांना विश्वास देण्यासाठी दोन तास काढावे लागायचे. आज गुंतवणूकदारांना धक्का बसला असेल. सर्वांनी राज्याच्या हितासाठी गुंतवणुकीचं वातावरण तयार करायला हातभार लावावा.
ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप-शिंदे गटाला जास्त यश मिळाल्याचा दावा केला जातोय. मात्र हे दावे खोडून काढताना शरद पवार म्हणाले, ‘ 173 ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेस तर 84 ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा विजय झालाय. एकूण ग्रामपंचायतींपैकी 285 मविआला तर शिंदे गट आणि भाजपला 210 जागा मिळाल्या आहेत.
पत्राचाळ घोटाळ्यात शरद पवारांच्या नावाचा उल्लेख ईडीच्या आरोपपत्रात असल्याचं समोर आलंय. यावरून शरद पवारांची चौकशी करण्याची मागणी भाजपतर्फे करण्यात येतेय. यावर बोलताना शरद पवार म्हणाले, 2006- 07 च्या ज्या बैठकांचा उल्लेख करण्यात येतोय, त्यावेळचे कागदपत्र मी देतो. बैठकीत काय झालं, कुणाच्या सह्या होत्या हे सर्व यात आहे. राज्य सरकार चौकशीची मागणी करतंय. आम्ही सहकार्य करू. पण आरोपात काही उघड झालं नाही तर काय करायचं हेही एकदा राज्य सरकारनं स्पष्ट करावं…
शिवसेना हे शरद पवारांच्या पिंजऱ्यातलं मांजर आहे, असं वक्तव्य आज मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलंय. शरद पवार यांनी मात्र यावर काहीही बोलणं टाळलं. ते म्हणाले, ‘ हाताच्या बोटावर मोजण्याएवढे सदस्यही ज्यांना विधीमंडळात निवडून आणता येत नाही, त्यांचं काय मनावर घ्यायचं? असं प्राणी वगैरेवर मी काही बोलणार नाही, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं.