पवारांच्या रणनीतीने साताऱ्यात दोन्ही राजेंचा मार्ग खडतर

| Updated on: Sep 20, 2019 | 7:26 PM

उदयनराजेंची लोकसभेची पोटनिवडणूक आणि शिवेंद्रराजेंची सातारा-जावली विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजप कार्यकर्त्यांना प्रचंड कष्ट करावे लागणार आहेत, असं राजकीय विश्लेषक सांगतात.

पवारांच्या रणनीतीने साताऱ्यात दोन्ही राजेंचा मार्ग खडतर
संग्रहित फोटो
Follow us on

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात गेलेले उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले या दोघांसमोरचा (Udayanraje and Shivendraraje) यापुढील मार्गही खडतर असणार आहे. दोघांना (Udayanraje and Shivendraraje) भाजपात गेल्याने बळ तर मिळणार आहे. पण राष्ट्रवादीकडूनही तेवढ्याच ताकदीचे उमेदवार दोघांविरोधात देण्याची चाचपणी सुरु आहे. उदयनराजेंची लोकसभेची पोटनिवडणूक आणि शिवेंद्रराजेंची सातारा-जावली विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजप कार्यकर्त्यांना प्रचंड कष्ट करावे लागणार आहेत, असं राजकीय विश्लेषक सांगतात.

लोकसभा पोटनिवडणुकीसाठी श्रीनिवास पाटील?

सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून माजी खासदार श्रीनिवास पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. उदयनराजे भोसले विरुद्ध श्रीनिवास पाटील अशीच लढत होईल अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. उदयनराजे भोसले यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आता साताऱ्यात पोटनिवडणूक होत आहे.

श्रीनिवास पाटील दोन वेळा जुन्या कराड लोकसभा मतदारसंघातून खासदार होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून श्रीनिवास पाटील यांची ओळख आहे. श्रीनिवास पाटील यांच्या उमेदवारीमुळे उदयनराजेंसमोर मोठं आव्हान उभं राहू शकतं. माजी खासदार श्रीनिवास पाटील यांचा कराड, पाटण, सातारा या ठिकाणी मानणारा वर्ग मोठा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने उदयनराजेंच्या विरोधात हुकमी एक्का तयार केला आहे. उदयनराजेंच्या संभ्रमी भूमिकेमुळे यापुढील पोटनिवडणुकीत मोठा फायदा श्रीनिवास पाटील यांना होऊ शकतो.

सातारा-जावली मतदारसंघातही अडचणी वाढणार

सातारा विधानसभा मतदारसंघातही नाट्यमय घडामोडी घडत आहेत. भाजपाला सातारा जिल्ह्यात मोठा सुरुंग लागला आहे. भाजपचे साताऱ्याचे नेते दीपक पवार यांनी पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादीत जाणार असल्याचं जाहीर केलंय.

शिवेंद्रराजे भोसले यांचे दीपक पवार हे पारंपरिक कट्टर विरोधक समजले जातात. शिवेंद्रराजे भोसले भाजपात आल्यानंतर दीपक पवार यांनी बंडाचा झेंडा फडकवला. त्यामुळे शिवेंद्रराजे भोसले साताऱ्यात चांगलेच अडचणीत आले आहेत. दीपक पवार हे 22 सप्टेंबरला शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. दीपक पवार यांच्या भूमिकेमुळे सातारा विधानसभा मतदारसंघात चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे.