मुंबई : फ्रान्सकडून भारताला मिळालेल्या पहिल्या राफेल लढाऊ विमानाची पूजा केल्यामुळे काँग्रेस मोदी सरकारवर टीका करत आहे. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी ही पूजा म्हणजे तमाशा असल्याचंही म्हटलंय. पण शस्त्र पूजा हा तमाशा नसतो, तर ती आपली जुनी परंपरा आहे, असं म्हणत काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी (Mallikarjun Kharge Sanjay Nirupam) खर्गेंवर निशाणा साधला आहे. खर्गे हे नास्तिक आहेत, पण काँग्रेसमधील प्रत्येक जणच नास्तिक नाही, असंही ते (Mallikarjun Kharge Sanjay Nirupam) म्हणाले.
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पॅरिसमध्ये राफेलची पूजा केली आणि चाकाखाली लिंबूही ठेवलं. यावर मल्लिकार्जुन खर्गेंनी टीका केली. आम्ही बोफोर्ससारखी शस्त्र आणली तेव्हाही त्याची पूजा केली नव्हती, असं ते म्हणाले. त्यामुळे पॅरिसमध्ये जे सुरु होतं, तो एक तमाशा होता, अशी टीका त्यांनी केली.
भारताने फ्रान्ससोबत 36 राफेल विमानांचा करार केला आहे, ज्यापैकी पहिलं विमान भारताला दसऱ्याच्या मुहूर्तावर मिळालं. फ्रान्समध्येच या विमानाची पूजा करण्यात आली. राजनाथ सिंह यांनी विमानावर ओम काढला, हार घातला आणि चाकाखाली लिंबू ठेवलं. हा सर्व प्रकार तमाशा होता, असं खर्गेंचं म्हणणं आहे.
दरम्यान, संजय निरुपम यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर निशाणा साधण्याची ही पहिलीच वेळ नाही. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी खर्गेंवर टीका केली होती. निवडणुकीच्या तयारीसाठी खर्गेंनी बैठक बोलावली होती, 15 मिनिटात बैठक संपवून गेले आणि कुणाला काहीही बोलू दिलं नाही. असे नेते काँग्रेसला वाचवतील की बंदोबस्त करतील? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता.
निरुपम सध्या काँग्रेसवर नाराज आहेत. लोकसभा निवडणुकीच्या काळात त्यांना काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदावरुन दूर व्हावं लागलं. त्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी शिफारस केलेल्या एका उमेदवारालाही संधी देण्यात आली नाही. त्यामुळे प्रचारातही सहभागी होणार नसल्याची भूमिका संजय निरुपम यांनी घेतली.