पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीकडे (Bihar Vidhansabha Election) सगळ्या देशाचं लक्ष लागून राहिलंय. बिहारच्या मुख्यमंत्रिपदी पुन्हा एकदा नितीश कुमार (Nitish Kumar) विराजमान होणार की तरुण तडफदार तेजस्वी यादव (Tejashwi yadav) बाजी पलटवणार?, अशी चर्चा देशभरात होत आहे. अशातच प्रसिद्ध अभिनेते तथा काँग्रेसचे दिग्गज नेते शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांनी खास त्यांच्या स्टाईलमध्ये बिहार निवडणूक महागठबंधनच जिंकणार असं सांगत नितीश कुमार तसंच भाजप ‘खामोश’ होईल, असा अंदाज वर्तवला आहे. (Shatrughan Sinha on Bihar Vidhansabha Election)
“तेजस्वी यादव यांनी दिलेल्या 10 लाख नोकऱ्यांच्या आश्वासनामुळे नितीश कुमारांसहित एनडीएच्या पायाखालची वाळू घसरलीय. बिहारच्या जनतेला तरुण नेतृत्वावर विश्वास आहे. तेजस्वी यांचा धडाकेबाज निवडणूक प्रचार आणि जनतेने त्यांना दिलेली साथ यावरुन हे स्पष्ट होतंय की जनतेला बदल हवा आहे. त्याचबरोबर तेजस्वी यांची युवा ब्रिगेड त्यात समाविष्ट असलेले लव सिन्हा आणि अन्य साथी मिळून बिहारचा चेहरामोहरा बदल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास बिहारी जनतेमध्ये दिसून येत आहे”, असं शत्रुघ्न सिन्हा म्हणाले.
“बिहारमध्ये महागठबंधनचा विजय निश्चित आहे. कारण लोकांचा कौल देखील तसाच आहे. जनतेला आता बदल हवा आहे. युवा वर्गाचे प्रतिनिधित्व करणारे राहुल गांधी, तेजस्वी यादव यांचा उत्साह पाहून विजय आमचाच होणार हा आत्मविश्वास महागठबंधनकडे आहे”, असंही शत्रुघ्न सिन्हा म्हणाले.
“तेजस्वी यादव यांचा अनुभव कमी आहे, असं म्हणणारे विरोधक येत्या 10 तारखेला निवडणूक निकालानंतर पूर्णपणे खामोश होतील. कारण बिहारच्या जनतेला आता जुमलेबाजी नकोय तर विकास करुन दाखवणारं सरकार हवंय आणि लोकांची हीच अपेक्षा महागठबंधनचे सरकार पूर्ण करेल”, असं शत्रुघ्न सिन्हा म्हणाले. शत्रुघ्न सिन्हा यांनी पंतप्रधान मोदींवरही चांगलीच टोलेबाजी केली.” नरेंद्र मोदी काँग्रेसमुक्त भारत करायला निघाले होते परंतु आता काँग्रेसयुक्त होतो आहे”, असं ते म्हणाले.
“काँग्रेस पक्षाचं देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मोठं योगदान राहिलेलं आहे. काँग्रेस पक्षाची ओळख धाडसी, निडर अशी राहिलेली आहे. याऊलट भाजपचं स्वातंत्र्यलढ्यात योगदान काय?”, असा सवाल उपस्थित करत बिहारच्या जनतेने महागठबंधनच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचं आवाहन सिन्हा यांनी केलं.
(Shatrughan Sinha on Bihar Vidhansabha Election)
संबंधित बातम्या
नितीश कुमारांवर भरसभेत कांदाफेक, बिहारच्या मुख्यमंत्र्यांवर रोष
बिहारमध्ये बदलाचे वारे? भरसभेत मुख्यमंत्री नितीश कुमारांवर पुन्हा ओढावली नामुष्की