लखनौ : भाजपचे खासदार आणि ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नी पूनम सिन्हा या लखनौमधून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. त्या समाजवादी पक्षाकडून निवडणूक लढवू शकतात. सूत्रांनुसार, लखनौ मतदारसंघातून पूनम सिन्हा निवडणूक लढवणार असल्याने काँग्रेसने या मतदारसंघात आपला उमेदवार देणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. काँग्रसेने सपा-बसपाच्या उमेदवार पूनम सिन्हा यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या मतदारसंघात पूनम सिन्हा आणि राजनाथ सिंह यांच्यात कडवी लढत होण्याची शक्यता आहे.
लखनौ मतदारसंघातून जितीन प्रसाद निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र, त्यांना धैरहरा मतदारसंघातून तिकीट देण्यात आल्याची माहिती काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. काँग्रेसने सपा-बसपा आघाडीसाठी सात जागा सोडणार असल्याचं म्हटलं होतं, लखनौही त्यापैकी एक आहे.
पूनम यांच्या सपामध्ये प्रवेशाची तयारी केली जात आहे. त्यामुळे शत्रुघ्न सिन्हांना त्यांच्या काँग्रेस प्रवेशाचा कार्यक्रम स्थगित करावा लागल्याची माहिती आहे. सिन्हा 28 मार्चला काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते. आता येत्या 6 एप्रिलला शत्रुघ्न सिन्हा दिल्लीमध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. सिन्हा पटना साहिब मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
विरोधीपक्ष राजनाथ सिंह यांचा पराभव करण्यासाठी कडवं आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. यासाठी काँग्रेस सपा-बसपाच्या उमेदवार पूनम सिन्हा यांना पाठिंबा दिला आहे. यामुळे राजनाथ सिंह यांचा पराभूत करणं सोपं होईल, अशी चर्चा आहे.
लखनौ मतदारसंघात 3.5 लाख मुस्लिम मतदार आहेत. याशिवाय, चार लाख कायस्थ मतदार आणि 1.3 लाख सिंधी मतदार आहेत. पूनम सिन्हा सिंधी कुटुंबातील आहेत, तर शत्रुघ्न सिन्हा हे कायस्थ आहेत. विशेष म्हणजे सपाकडे मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतदार आहेत.