राजीव गिरी, नांदेडः शिवसेनेच्या (Shivsena) दोन्ही गटांना मिळालेल्या नव्या चिन्हांचा वाद अजून शमलेला दिसत नाहीये. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मिळालेल्या मशालीवरून समता पार्टीने आक्षेप घेतलाय. तर आता एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) गटाला मिळालेल्या ढाल-तलवार या चिन्हावरून शिख बांधवाने आक्षेप घेतला आहे. निवडणूक आयोगाने त्रिशुळ ह चिन्ह जसं धार्मिक आहे, म्हणून वगळलं तसं ढाल-तलवार हे चिन्ह शिख धर्मियांशी संबंधित आहे, असा आक्षेप त्यांनी घेतलाय.
नांदेड येथील गुरुद्वारा बोर्डाचे रणजितसिंग कामठेकर यांनी टीव्ही9 शी बोलताना याविषयीची भूमिका सविस्तर मांडली. ते म्हणाले, त्रिशुळ जशी धार्मिक निशाणी आहे, तशी ढाल तलवारही धार्मिक आहे.
गुरुगोविंदसिंगजी महाराजांनी खालसा पंथाच्या स्थापनेवेळी ढाल आणि तलवार पंथाला दिली आहे. आमच्या पाचही तख्तावर ढाल तलवारीची पूजा दररोज होते. त्यामुळे ज्या प्रमाणे त्रिशुळाला चिन्हांच्या यादीतून बाद करण्यात आलं. त्याचप्रमाणे ढाल तलवार निशाणीलाही बाजूला करावं…अशी मागणी त्यांनी केली आहे.
तसेच यापुढे कोणत्याही राजकीय पक्षाला ढाल तलवार हे चिन्ह देऊ नये, अशी विनंती मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नेते अशोक चव्हाण, शरद पवार, तसेच इतरही मोठ्या नेत्यांना मी ट्विट केलंय.
खालसा पंथाची निशाणी कोणत्याही पक्षाला देऊ नये, अशी विनंती मी ममता बॅनर्जी आदी नेत्यांनाही केली आहे. निवडणूक आयोगाने ही विनंती मान्य नाही केली तर संविधानाप्रमाणे आम्ही पुढची लढाई लढू, असा इशारा शीख बांधवांनी दिलाय.