शिंदे गटात लवकरच फूट पडणार, प्रत्येक फुटीर गटात एक शिंदे असतोच; संजय राऊत यांचं मोठं विधान

| Updated on: Nov 13, 2022 | 12:20 PM

कीर्तिकरांच्या विषयावर बोलण्याचं आम्ही सोडून दिलं आहे. त्यांनी घेतलेला निर्णय दुर्देवी आहे. अनेक लोकं सोडून गेले. पण गजाभाऊ सोडून गेल्याचं दु:ख अधिक आहे.

शिंदे गटात लवकरच फूट पडणार, प्रत्येक फुटीर गटात एक शिंदे असतोच; संजय राऊत यांचं मोठं विधान
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: कोणता गट काय मतं व्यक्त करतो त्यात मला पडायचं नाही. पण महाराष्ट्रात मध्यावधीची तयारी सुरू झाली आहे. जे म्हणतात हा आमच्याबरोबर आहे, तो आमच्याबरोबर आहे, त्यांच्या गटातच मोठी फूट पडण्याची तयारी सुरू झाली आहे. फुटीरांच्या प्रत्येक गटात एक शिंदे कायम असतो हे लक्षात घ्या, असं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. राऊत यांनी थेट शिंदे गट फुटणार असल्याचं भाष्य केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

अमोल कीर्तिकर यांनी आज खासदार संजय राऊत यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी मीडियाशी संवाद साधला. हा संवाद साधत असताना संजय राऊत यांनी शिंदे गटात मोठी फूट पडणार असल्याचं भाकीत केलं आहे.

अमोल कीर्तिकर हे आदित्य ठाकरे यांच्या संपूर्ण राजकीय प्रवासात राहिलेले कडवट शिवसैनिक आहेत. ते शिवसेनेसोबत आहे. ठिक आहे, गजाभाऊंनी एक निर्णय घेतला. त्यांच्या निर्णयासोबत अमोल नाहीत. ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. याचा आम्हाला आनंद आहे, असं संजय राऊत म्हणाले.

अमोल कीर्तिकर आमच्यासोबत आहेत, याचा निर्णय मोठा आहे. माझ्या शब्दात सांगायचं म्हणजे 100 दिवसानंतर तुरुंगातून सुटल्यावर मला जेवढा आनंद झाला नाही, त्यापेक्षा अधिक मला अमोल भेटायला आला,तो पक्षासोबत आहे. त्याने वडिलांना समजावण्याचा अटोकाट प्रयत्न केला. त्याचा आनंद आहे, असंही त्यांनी सांगितलं.

अमोल सारख्या कडवट लोकांमुळेच शिवसेनेचा पुढचा प्रवाह जाणार आहे. असे असंख्य अमोल कीर्तिकर आहेत. सूरज चव्हाण आहेत, आम्ही आहोत, तरुण मुलं आहेत. महाराष्ट्रात सर्वत्र काम सुरू आहे. आदित्य ठाकरे फिरत आहेत. उद्धव ठाकरे फिरणार आहे. त्यामुळे आगामी काळात शिवसेना वाढणार आहे, असं ते म्हणाले.

कीर्तिकरांच्या विषयावर बोलण्याचं आम्ही सोडून दिलं आहे. त्यांनी घेतलेला निर्णय दुर्देवी आहे. अनेक लोकं सोडून गेले. पण गजाभाऊ सोडून गेल्याचं दु:ख अधिक आहे. पण तरीही अमोल आमच्यासोबत आहे. त्याचा आनंदही आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.