मुंबई : उद्धव ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे(MP Rajan Vichare) यांनी एक अत्यंत खळबळजनक आरोप केला आहे. माझ्या जीवाला काही बरं वाईट झाल्यास त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील अस राजन विचारे यांनी म्हंटले आहे. या संदर्भात राजन विचारे यांनी पोलिस महासंचलकांना पत्र देखील पाठवले आहे.
पोलिस महासंचलकांना पाठवलेल्या या पत्रात त्यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शिंदे-फडणवीस सरकारच्या सूचनेनुसार पोलिस सरंक्षणात कपात केल्याचा आरोप त्यांनी पत्रात केला आहे.
मला आणि माझ्या कुटुंबांच्या जीविताला धोका निर्माण झाल्यास मुख्यमंत्री आणि फडणवीस जबाबदार असतील. माझ्या पोलिस सरंक्षणात वाढ करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
महाराष्ट्र शासनाने सूडबुद्धीने माझी सुरक्षा काढली आहे. मी रात्री-अपरात्री माझ्या मतदारसंघांमध्ये फिरत असतो. अशा वेळेस माझ्यासह कुठलाही प्रकारची दुर्घटना घडल्यास किंवा हल्ला झाल्यास अथवा माझ्या कुटुंबियांना काही धोका निर्माण झाल्यास याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जबाबदार असतील.
त्यामुळे मला पूर्वी जशी सुरक्षा होती तशाच प्रकारची सुरक्षा पुन्हा देण्यात यावी अशी मागणी राजन विचार यांनी पत्राद्वारे केली आहे.
यापूर्वी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील माझ्या जीवाला धोका असल्याचे सांगीतले होते. अंधारे यांच्या पाठोपाठ आता राजन विचारे यांनी देखील जीव धोक्यात असल्याचे म्हंटले आहे.