शिर्डी : शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनी विजय मिळवला. चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला मतदान झालं. इथे यंदा 64.54 टक्के मतदानाची नोंद झाली. या मतदारसंघात 2014 च्या तुलनेत मतदानाचा टक्का काहीसा म्हणजेच 0.77 टक्क्यांनी वाढला आहे. शिर्डी लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे, काँग्रेसकडून श्रीरामपूरचे विद्यमान आमदार भाऊसाहेब कांबळे, वंचित बहुजन आघाडीकडून संजय सुखदान, भाकपकडून बन्सी सातपुते तसेच अपक्ष आणि भाजपचे बंडखोर भाऊसाहेब राजाराम वाकचौरे यांच्यात पचरंगी लढत होईल असं चित्र सुरूवातीला दिसून आलं. मात्र प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात शिवसेना आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच होणार हे स्पष्ट झालं.
पक्ष | उमेदवार | निकाल |
---|---|---|
भाजप/शिवसेना | सदाशिव लोखंडे (शिवसेना) | विजयी |
काँग्रेस/ राष्ट्रवादी | भाऊसाहेब कांबळे (काँग्रेस) | पराभूत |
अपक्ष/इतर | संजय सुखदान (वंचित) | पराभूत |
राज्यातील प्रमुख लढतीपैकी एक
राज्यातील लक्षवेधी लढत म्हणून शिर्डीकडे सर्वांच्या नजरा लागल्या. या निवडणुकीत उमेदवार, पक्ष यापेक्षा विखे आणि थोरातांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटिल यांचे सुपुत्र डॉ. सुजय विखे पाटील यांना काँग्रेस आघाडीकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी भाजपात प्रवेश केला आणि भाजपकडून तिकीट मिळवलं.
डॉ सुजयच्या प्रवेशाने नगर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलून गेली. विखे पाटलांनी दक्षिणेत सुजयचा प्रचार केला, तर शिर्डी लोकसभा मतदारसंघात प्रवरेची सर्व यंत्रणा शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या मागे उभी केली. 23 एप्रिलला अहमदनगरची निवडणूक संपली आणि 24 एप्रिल पासून विखेंनी सर्व ताकतीनीशी लोखंडे यांचा प्रचार केला. तर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विखे विरोधकांची एकत्रित मोट बांधत काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांचेमागे आपली संपूर्ण यंत्रणा उभी केली.
विधानसभानिहाय 2014 आणि 2019 ची मतदानाची आकडेवारी
शिर्डी लोकसभा – 2014 2019
अकोले – 59.53 % 63.55%
संगमनेर – 63.55 % 66.44%
शिर्डी – 70.45 % 66.89 %
कोपरगाव – 65.52% 65.07%
श्रीरामपुर – 66.03% 65.05%
नेवासा – 57.56%. 69.04%
एकूण – 63.77%. 64.54%
2014 च्या तुलनेत मतदानाची टक्केवारी खूप वाढली नसली, तरी जिथे 70.45. टक्के मतदान झालं होतं तिथे यावेळी 66.89 टक्के मतदान झालं.
यंदाच्या निवडणुकीतील वैशिष्ट्ये
शिर्डी लोकसभेत निळवंडे धरणाच्या अपूर्ण कालवे, गोदावरी पाटपाणी म्हणजे खास करून पाण्याच्या भोवतीच निवडणुकीचा प्रचार दिसून आला. शिवसेनेचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे हे पाच वर्ष नॉट रिचेबल राहिले असा सूर सुरुवातीला दिसत होता. मात्र प्रचार संपेपर्यंत लोखंडे यांनी मतदारांचा विरोध बऱ्याच अंशी शमावला. कॉर्नर सभा, बैठका, मोठ्या नेत्यांच्या सभेतून त्यांनी मतदारांना साद घातली.
शिवसेना, काँग्रेस यांसह चर्चा झाली ती भाजप बंडखोर भाऊसाहेब वाकचौरे यांची. तोकडी प्रचार यंत्रणा असल्याने वाकचौरे यांचं पारडं हलकं होत गेलं. काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे यांची शालिन प्रतिमा मतदारापर्यंत घेऊन जाताना काँग्रेसने प्रचारात आघाडी घेतली. पक्षाध्यक्ष राहुल गांधी, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे शरद पवार, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, नाना पटोले आदींच्या सभा झाल्या.
शिवसेना उमेदवार लोखंडे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, पालकमंत्री राम शिंदे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन तर सांगता सभा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची झाली.
वंचित आघाडी साठी प्रकाश आंबेडकर, आ. इम्तियाज जलील यांची एक एक सभा पार पडली.
24 एप्रिल नंतर प्रवरेची संपूर्ण यंत्रणा लोखंडे यांच्या पाठीमागे उभी राहिली. डॉ. सुजय विखेंनी एका दिवसात चार पाच सभांचा धडाका लावला. राधाकृष्ण विखे पाटलांनीही शिवसेनेला ताकद दिली.
शिर्डी लोकसभेत खरी लढत ही शिवसेनेचे सदाशिव लोखंडे विरुद्ध काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे यांच्यातच झाली. या निवडणुकीच्या निकालावरून विखे आणि थोरात यांच्या राजकीय वाटचालीवरही परिणाम होणार असल्याने दोघांसाठी ही निवडणुक प्रतिष्ठितेची ठरली.