सांगली : विधानसभेचं वारं सध्या जोरदार वाहू लागलं आहे (Maharashtra Assembly Elections 2019). त्यातच सर्वच पक्षांतर्फे यात्रा, रॅलीच्या माध्यमातून मतदारांना साद घातली जात आहे. यासर्वांमध्ये सांगलीतील शिरोळचे आमदार उल्हास पाटील यांनी चक्क सायकलवरुन ‘जनआशीर्वाद यात्रा’ सुरु केली आहे (MLA Cycle Rally). या यात्रेच्या माध्यमातून ते सध्या पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या भेटीगाठी घेत आहेत.
शिरोळ तालुक्यात विधानसभेची जोरदार तयारी सुरु झाली आहे. शिवसेनेचे विद्यमान आमदार उल्हास पाटील यांनी मतदारांच्या भेटीगाठींसाठी थेट सायकलवरुन ‘जनआशीर्वाद यात्रा’ काढली (MLA Janashirwad Cycle Rally). मंगळवारी (24 सप्टेंबर) सकाळी श्रीक्षेत्र नृसिंहवाडीतील श्री दत्त मंदिरात अभिषेक संकल्प करत उल्हास पाटलांच्या सायकल वारीला सुरुवात झाली. 14 गावांतून 70 किलोमीटरचा प्रवास करुन बुधवारी (25 सप्टेंबर)ही सायकल वारी पूरग्रस्त राजापुरात दाखल झाली. महापुराने बाधित झालेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी ही यात्रा काढल्याचं उल्हास पाटील यांनी यावेळी सांगितलं.
विधानसभेचं लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून आमदार उल्हास पाटील तब्बल 54 गावातून सायकलवर प्रवास करणार आहेत. आमदारांची ही रॅली यशस्वी करण्यासाठी तालुक्यातील शिवसैनिकांनी देखील जोरदार तयारी केल्याचं पाहायला मिळत आहे. जिथे रॅली पोहोचते तिथे नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे पुराने होरपळलेले नागरिकही आमदार चक्क सायकल वरुन त्यांच्या भेटीसाठी पोहचल्याने त्यांचं स्वागत करत आहेत.
विधानसभेच्या तोंडावर प्रत्येक जण मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. मतदारांवर छाप पाडण्यासाठी नेतेमंडळी नवनवीन हातखंडे वापरतात. उल्हास पाटलांनी देखील थेट सायकल रॅली काढून पूरग्रस्तांच्या भेटीगाठी सुरु केल्या. त्यामुळे आता त्यांची ही जनआशीर्वाद सायकल रॅली त्यांना पुन्हा एकदा विधानसभेत पोहोचवणार की नाही? हे तर निकालानंतरच स्पष्ट होईल.
पाहा व्हिडीओ :