‘ठाकरेंच्या देव्हाऱ्यातला धनुष्यबाणही एकनाथ शिंदेंचाच, लक्षात आहे का? उद्धव यांनी जपून ठेवलेला तो…’ कुणी केलाय शाब्दिक वार?

| Updated on: Feb 22, 2023 | 9:35 PM

शिवसेना प्रमुखांच्या पूजेतला आणि अजूनही आमच्या देव्हाऱ्यात असलेला धनुष्यबाण असा कुणी हिरावून घेऊ शकत नाही. ते कुणीही ओरबाडून घेऊ शकत नाही, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं होतं.

ठाकरेंच्या देव्हाऱ्यातला धनुष्यबाणही एकनाथ शिंदेंचाच, लक्षात आहे का? उद्धव यांनी जपून ठेवलेला तो... कुणी केलाय शाब्दिक वार?
Image Credit source: social media
Follow us on

मुंबईः निवडणूक आयोगाने (Election commission) धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी अनेकदा माध्यमांसमोर येऊन संतप्त भावना व्यक्त केल्या. कागदोपत्री धनुष्यबाण चिन्ह आयोगाने एकनाथ शिंदे यांना दिलं असलं तरीही स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे खरे धनुष्यबाण माझ्याकडे आहे… असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या देव्हाऱ्यात पूजला जाणारा धनुष्यबाण दाखवला होता. मात्र शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी यावरूनही उद्धव ठाकरे यांना डिवचलं आहे. उद्धव ठाकरे यांनी दाखवलेला तो धनुष्यबाणही एकनाथ शिंदे यांनीच दिला होता, असं शीतल म्हात्रे यांनी दाखवून दिलंय.

शीतल म्हात्रे यांचं खोचक ट्विट

उद्धव ठाकरे यांच्यावर शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी खोचक टीका केली आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देवघरात ठेवलेला धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनीच दिलेला होता… हे तरी लक्षात आहे का? असा सवाल करीत त्यांनी उद्धव ठाकरे यांना टॅग केलंय. त्यावरून शिवसैनिकांच्या असंख्य प्रतिक्रियाही येत आहेत.

उद्धव ठाकरेंनी दाखवला होता धनुष्यबाण…

निवडणूक आयोगाने निकाल दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली होती. देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरु आहे. मात्र पंतप्रधानांनी ७५ वर्षांचं स्वातंत्र्य संपवून आता देशात बेबंदशाहीला सुरुवात होत आहे, अशी घोषणा करायला हरकत नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. निवडणूक आयोगाने शिंदे गटाला धनुष्यबाण दिला तरी स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी देव्हाऱ्यात पूजलेला धनुष्यबाण मी तुम्हाला दाखवतो, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी हा धनुष्यबाण दाखवला होता.

ते म्हणाले होते, या धनुष्यबाणावर कुंकूदेखील आहे. शिवसेना प्रमुखांच्या पूजेतला आणि अजूनही आमच्या देव्हाऱ्यात असलेला धनुष्यबाण असा कुणी हिरावून घेऊ शकत नाही. ते कुणीही ओरबाडून घेऊ शकत नाही. बाळासाहेबांनी त्यांच्या हातांनी पूजलेला धनुष्यबाण त्याचं तेज या शक्तीला दाखवल्याशिवाय राहणार नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले होते.

अयोध्येत भगव्या धनुष्यबाणाची पूजा

दरम्यान, एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण मिळाल्यानंतर अयोध्येत आज भगव्या धनुष्यबाणाची पूजा केली जात आहे. विदर्भातील शिंदे गटाच्या नेत्यांनी अयोध्येत ही पूजा आयोजित केली आहे. अयोध्येतील रामाच्या मंदिरात पूजलेला धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना दिला जाणार आहे. तसेच पुढील आठवड्यात एकनाथ शिंदेदेखील सर्व आमदार आणि खासदारांसोबत अयोध्या दौरा करणार असल्याचं सांगण्यात येतंय. त्यानंतर शिवसेनेचा धनुष्यबाण शिंदे गटातर्फे राज्यभर फिरवला जाणार असल्याचं म्हटलं जातंय.