भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर : शिवतीर्थावरील मेळावा (Shivaji Park Dussehra Melava) हा विरोधकांना धडकी भरवणारा होईल, असा विश्वास कोल्हापूरमधील (Kolhapur) शिवसेनेचे नेते संजय पवार (Sanjay Pawar) यांनी व्यक्त केला. दसरा मेळाव्याला जायला निघण्याआधी त्यांनी हे वक्तव्य केलं. टीव्ही 9 मराठीसोबत बोलताना संजय पवार यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली. त्यांची ती सहल आहे, असं म्हणत खोचक टोला संजय पवार यांनी यावेळी लगावला.
शिवसेना नेते संजय पवार यांनी म्हटलंय की, टुर्स आणि ट्रॅव्हल कंपन्या महाराष्ट्राने देशभरात अनेकदा पाहिलेल्या आहेत. त्यात मोफत गाडी, नाश्ता, जेवणं देणं, हे असतं. पण ती सहल होते. आमची सहल नाही. आमचा मेळावा आहे, असं म्हणत संजय पवार यांनी शिंदे गटावर टीका केली.
यंदाचा दसरा मेळावा भव्यदिव्य असा होणार, असा विश्वास संजय पवार यांनी व्यक्त केला. आमची गर्दी कमी व्हावी म्हणून शिंदे गटाने दसरा मेळावा घेतलाय. आम्हाला चिडवण्यासाठी बीकेसीत दसरा मेळावा घेण्याचा घाट शिंदे गटाने घातलाय. पण आम्ही शिवतीर्थावर विचारांचं सोन लुटायला जाणार आहोत. गद्दार कसले विचार मांडणार? असा सवालही संजय पवार यांनी उपस्थित केला.
पक्षप्रमुखांचा विश्वासघात कसा करायचा? गद्दारी कशी करायची?, हा विचार सांगणार हे लोकं आहेत, असं म्हणत पवार यांनी शिंदे गटावर टीका केली. सत्तेसाठी आणि पैशांसाठी बंडखोरी करणाऱ्यांकडून कसल्या विचारांची अपेक्षा करणार, असा टोलाही त्यांनी लगावला.
काल मी आपल्या माध्यमातून पाहिलं तर अनेकांना माहिती नाही की कुणाची सभाय? पण बसा, तुम्हाला मुंबई फिरवून आणतो, असं म्हणून लोकांना आणलं जात असल्याचा टोलाही संजय पवार यांनी लगावला.