मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत हे महाराष्ट्रात पुढील पंचवीस वर्ष आमची सत्ता राहील, असा दावा करतात. परंतु, पुढील निवडणुकीत राज्यात शिवसेनेचे 10-15 आमदारही निवडून येणार नाहीत, असा दावा भाजप नेते नारायण राणे यांनी केला. गेल्या विधानसभा निवडणुकीतही नरेंद्र मोदी यांच्या नावावरच शिवसेनेचे 56 आमदार निवडून आले. अन्यथा शिवसेनेचे 25 आमदारही जिंकले नसते, अशी टीका नारायण राणे यांनी केली. (BJP leader Narayan Rane criticized CM Uddhav Thackeray)
संजय राऊत महाराष्ट्रातील सरकार पाडून दाखवा, असे सांगतात. मात्र, हे सरकार पाडण्याची गरजच नाही, ते आपोआप पडेल. संजय राऊत म्हणजे विदुषक आहे. तर उद्धव ठाकरे यांनाही शिवसैनिक मान देत नाहीत, अशी जोरदार फटकेबाजी करत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणाचा समाचार घेतला. संजय राऊत ‘सामना’त म्हणतात आम्ही 5 वर्षे पूर्ण करणार, मात्र यांच्याकडे आमदार किती आहेत? संजय राऊत विदुषक आहेl. शिवसेना 25 वर्ष सत्तेत म्हणतात. हे कोणत्या नशेत आहेत? शिवसैनिकांची कामे होत नाहीत. शिवसेनेच्या आमदार- खासदारांना कुणी विचारत नाही. शिवसेनेत असंतोष आहे, असे नारायण राणे यांनी म्हटले.
आजच्या संपूर्ण परिषदेत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला. राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर ‘पुळचट’, ‘शेळपट’ ‘बुद्धू’ अशा शेलक्या शब्दांत टीका केली. तसेच उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी लायक व्यक्ती नसल्याचेही त्यांनी म्हटले. राणे यांच्या या शेलक्या टीकेमुळे आता शिवसैनिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात राणे कुटुंबीय आणि शिवसेना नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगण्याची चिन्हे आहेत.
शिवसेनेची भविष्यातील वाटचाल भव्यदिव्यच असेल; राऊतांनी मांडली ‘महा’ क्रोनोलॉजी
शिवसेनेची भविष्यातील वाटचाल ही भव्यदिव्य असेल. गेल्यावर्षी याच दिवसात युद्धाला प्रारंभ झाला. आपण महाराष्ट्रात असत्यावर विजय मिळवून आजचा महाविजयादशमी मेळावा साजरा करत आहोत. त्यामुळे आता यापुढे शिवसेनेच्या आयुष्यात ‘महा’राष्ट्र, ‘महा’विकासआघाडी अशा महा (मोठ्या) गोष्टीच घडतील, असे प्रतिपादन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले होते.
भविष्यात शिवसेनेने दिल्लीचे तख्त राखण्याच्या दिशेने वाटचाल केल्यास आश्चर्य वाटून घेऊ नका. कोणी कितीही चिखलफेक केली तरी ठाकरे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल. किंबहुना त्यानंतरची 25 वर्ष आपलेच सरकार असेल, असेही संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले होते.
संबंधित बातम्या:
पंतप्रधान मोदींच्या धोरणावर बोलण्याची उद्धव ठाकरेंची लायकी नाही; नारायण राणेंचा घणाघात
कोरोनामुळं सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात, ही मुख्यमंत्र्यांची जबाबदारी नाही का?, नारायण राणेंचा सवाल
(BJP leader Narayan Rane criticized CM Uddhav Thackeray)