मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या वादग्रस्त व्यक्तव्याचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जोरदार समाचार घेतला आहे. ज्या महाराष्ट्राचं (Maharashtra) मीठ तुम्ही तीन वर्ष खात आहात त्या मिठाशी तुम्ही नमकहरामी केली आहे. जे नवहिंदूवादी आहेत. ज्यांना हिंदुत्वाचे मोड फुटले आहेत. ते कडवे असतील तर त्या मोडधारी सत्ताधारी हिंदूंना ते हिंदू असतील आणि मराठी असतील तर त्या सरकारने राज्यपालांविषयी भूमिका घेतली पाहिजे. जे पार्सल कुठून तरी पाठवलं आहे. ते पार्सल राज्यपालपदाचा आदर राखत नसेल महाराष्ट्रात राहून जातीपाती आणि धर्मात आग लावण्याचे काम करत असेल, मराठी माणसाचा अपमान करत असेल तर त्यांना घरी पाठवायचं की तुरुंगात पाठवायचं हा निर्णय सरकारने घ्यावा, समस्त हिंदूंच्या वतीने मी ही मागणी करतो असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की, राज्यपाल म्हणून त्या खुर्चीचा मान राज्यपालांनी ठेवला पाहिजे. पण त्या खुर्चीत बसवलेल्या कोश्यारींनी त्या खुर्चीचा मान ठेवला नाही. गेल्या तीन वर्षांतील त्यांची विधाने असतील काही त्यांचे कॅमेऱ्याने टिपलेली दृष्य असतील ते पाहिल्यावर महाराष्ट्राच्या नशिबी असे माणसे का येतात हा प्रश्न पडतो. मी मुख्यमंत्री असताना लॉकडाऊनच्या काळात लोकांचे प्राण जात होते. तेव्हा यांना सर्वधर्मीयांची प्रार्थना स्थळे उघडण्याची घाई झाली होती. मी तो विषय वाढवला नाही. त्यांनी पत्र दिलं त्यावर मी उत्तर दिलं होतं. मी मुख्यमंत्री म्हणून तेव्हा जबाबदारी पार पाडली. मध्ये सावित्रीबाई फुलेंबद्दलही ते वादग्रस्त बोलल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
शुक्रवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्र आणि मुंबईबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं, ते एका राजस्थानी समाजाच्या कार्यक्रमात बोलत होते. मुंबईमधून जर गुजराती आणि राजस्थानी समाज काढून टाकला तर मुंबई, ठाणे आणि त्या परिसरात पैसा उरणार नाही. मुंबईची ओळख आर्थिक राजधानी अशी आहे, ती ओळख पुसली जाईल असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्त्यावर आता स्वपक्षातील नेत्यांसह विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे.