मुंबईः शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ‘सामना’ला (Saamana) दिलेल्या मुलाखतीतला एक शब्द तमाम बंडखोर आमदारांच्या जिव्हारी लागलाय. उद्धव ठाकरेंनी आमच्यासाठी हा शब्द वापरायला नको होता. आम्ही काय त्यांच्यासाठी पालापाचोळा आहोत का, असा सवाल बंडखोर आमदार (Shivsena Rebel MLA) विचारत आहेत. शिवसेनेतून बाहेर गेलेले हे एखाद्या झाडापासून गळणाऱ्या पाला-पाचोळ्यासारखे आहेत, असं वक्तव्य शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मुलाखतीत केलं. त्यानंतर एकानंतर एक अशा आमदारांच्या प्रतिक्रिया येत आहेत. आता आम्हाला पाचोळा म्हणताय, पण आम्हीदेखील आयुष्याची महत्त्वाची वर्ष शिवसेनेसाठी दिली आहेत. महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात शिवसेना पोहोचवण्यासाठी जीवाचं रान केलंय, असं वक्तव्य आमदार संजय शिरसाट यांनी केलं. आमदार शंभूराजे देसाई यांनीदेखील यावर तीव्र प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांची भाषा बोलू नये. अडीच वर्षांपासून आमची कोंडी सुरु आहे. उद्धव ठाकरेंबद्दल आदर आहे, पण त्यांनी आम्हाला पालापाचोळा म्हणू नये, असं वक्तव्य देसाई यांनी केलंय.
शिवसेनेत मोठं वादळ आलं असून आता तिचं अस्तित्वच संपुष्टात आल्याची टीका केली जातेय. यावर बोलताना उद्धव ठाकरेंनी मुलाखतीत अत्यंत धारदार प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, शिवसेनेत वादळ आलं आहे, हे बरोबर आहे. पण या वादळात सडकी पानं झडलीच पाहिजे. सडणारी पानं झडलीच पाहिजेत. आपण म्हणताय वादळ आलंय. वादळ आल्यानंतर पाला पाचोळा उडतो. सध्या तो उडतोय. तो एकदा बसला की खरं दृश्य लोकांसमोर नक्कीच येणार आहे. मी शांत का आहे. तर मला शिवसेनेची चिंता नाहीये. मराठी माणसं आणि हिंदुत्वाची चिंता आहे. आपल्या घरातच हिंदुद्वेष्टे आहेत. मराठी माणसाची एकजूट तुटावी, असा प्रयत्न केला जातोय. तो आपल्याच कळाकरंट्यांच्या हातनं केला जातोय. म्हणून मी म्हणतोय हा पालापाचोळा उडतोय. जे गळणं गरजेची होती, ती निघून जात आहेत. मी मागे म्हणलो होतो. वर्षामध्ये दोन झाडं आपल्या घराला लागूनच आहेत. एक गुलमोहर आणि बदामाचं. या झाडांची पानगळ पाहिलीय. पानं पूर्ण गळून जातात. आपल्याला वाटतं, या झाडाला काय झालंय.. आठ दिवसात बदामाचं झाड, गुलमोहराचं झाडही डवरून येतं. तसंच शिवसेनेचंही होणार.
उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांना पाला पाचोळ्याचीच उपमा दिली नाही तर त्यानंतर त्याचे काय हाल होतात यावरही भाष्य केलं. ते म्हणाले, ‘ आता सडलेली पानं झडत आहेत. ज्या झाडाकडून सगळं काही मिळालं. म्हणून त्यांचा टवटवीतपणा मिळाला होता. ती गळून जातात. मग म्हणतात, बघा झाड कसं उघडं बोडखं झालंय. मग दुसऱ्या दिवशी माळी येतो. केराच्या टोपलीत ही पानं घेऊन जातो. ही प्रक्रिया आता सुरु झाली आहे. आता नवे कोंब फुटायला लागलेत. शिवसेना आणि तरुण हे नातं शिवसेनेच्या जन्मापासून आहे. अजूनही काही ज्येष्ठ शिवसैनिक येऊन भेटत आहेत. बाळासाहेबांसोबत काम त्यांनी केले आहे. ते आजही आशीर्वाद देत आहेत…