संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाकड़ून (Central Election Commission) शिवसेनेला (Shiv Sena Dhanush Ban News) 5 ऑक्टोबरपर्यंत वेळ देण्यात आलीय. 5 ऑक्टोबरपर्यंत उद्धव ठाकरेंना आता धनुष्यबाण चिन्हाबाबत आपली बाजू मांडावी लागणार आहे. त्यानंतर धनुष्यबाणाचा फैसला निवडणूक आयोगासमोर होईल. त्यासाठी शिवसेनेला आपली बाजू मांडण्यासाठी आता निवडणूक आयोगाकडून उद्या पर्यंतची मुदत देण्यात आलीय. अंधेरी पोटनिवडणुकीच्या आधी निवडणूक आयोग धनुष्यबाण चिन्हाबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती समोर येते आहे.
सुप्रीम कोर्टात घटनापीठासमोर सध्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा खटला सुरु आहे. घटनापीठाने धनुष्यबाण चिन्हाबाबत निर्णय घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाला मागच्या सुनावणीमध्ये दिले होते. त्यानुसार आता घडामोडींना वेग आला आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशांनंतर आता निवडणूक आयोगही कामाला लागलंय.
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेला उद्यापर्यंत, अर्थात 5 ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली आहे. उद्या दसरा मेळावा देखील आहे. अशातच दुसरीकडे याच दिवशी शिवसेनेला धनुष्यबाण चिन्हाबाबत आपली भूमिका केंद्रीय निवडणूक आयोगासमोर स्पष्ट करावी लागणार आहे. त्यानंतर निवडणूक आयोग धनुष्यबाण चिन्हाबाबत पुढील निर्णय घेण्याची शक्यताय.
एकनाथ शिंदे गटाने आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा केलाय. त्यानंतर धनुष्यबाण चिन्हावरुनही शिंदे विरुद्ध ठाकरे असा संघर्ष उभा ठाकलाय. मागच्या सुनावणीमध्ये धनुष्यबाण चिन्हाआधी बंडखोर आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी घेण्याची मागणी शिवसेनेच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टासमोर केली होती. पण त्यानंतर शिंदे गटाच्या वकिलांनी मात्र या मागणीला विरोध केला होता.
उद्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने ठाकरे विरुद्ध शिंदे असा सामनाही रंगणार आहे. बीकेसीवर शिंदे गटाचा तर शिवतीर्थावर ठाकरे गटाचा दसरा मेळावा पार पडणार आहे. या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी एकीकडे सुरु आहे. अशातच दुसरीकडे आता शिवसेनेला धनुष्यबाण चिन्ह वाचवण्यासाठीही दसऱ्याच्या दिवशीच जोर लावावा लागणार आहे.