जळगाव : राज्यातील 147 कृषी उत्पन्न बाजार समितींच्या निवडणुकीचा निकाल आज समोर येतोय. या निवडणुकीत अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदारांकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं. कारण महाराष्ट्राच्या राजकारणातील भूकंपानंतर नऊ महिन्यांनी पार पडलेली ही निवडणूक महत्त्वाची आहे. कारण पुढच्यावर्षी लोकसभेची आणि विधानसभेची निवडणूक आहे. प्रत्येक पक्षात रणनीती आखली जातेय. या दरम्यान जनतेचा नेमका मूड काय? हे समजण्यासाठी आजचे निकाल महत्त्वाचे मानले जात आहेत. जळगावात पारोळा बाजार समितीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा धुव्वा उडाला. पण चोपडा बाजार समितीचा निकाल वेगळा लागला आहे.
चोपडा बाजार समिती येथे एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या आमदार लता सोनवणे यांच्या नेतृत्त्वात भाजप-शिंदे गटाच्या शेतकरी विकास पॅनलने 9 जागांवर विजय मिळवला आहे. तर महाविकास आघाडीच्या बळीराजा पॅनलला 5 जागांवर विजय मिळालाय. तसेच बंडखोर भाजप आणि राष्ट्रवादी प्रणित शेतकरी सहकार पॅनलला 4 जागांवर विजय मिळाला आहे.
चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल हा महत्त्वाचा आहे. कारण महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही गटांना स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. या बाजार समितीमध्ये काँटे की टक्कर असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे एकमेकांच्या कुबड्या घेऊन या ठिकाणी सत्ता स्थापन करावी लागणार असल्याचे सध्या तरी चित्र आहे.
दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातील पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शिंदे गटाच्या पदरी निराशा पडली आहे. पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार चिमणराव पाटील यांच्या गटाचा अक्षरश: धुव्वा उडाला आहे. त्यांच्या गटाचे फक्त 3 सदस्य निवडून आले आहेत. चिमणराव पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सतीश पाटील यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीने तब्बल 15 जागांवर विजय मिळवला आहे. सतीश पाटील यांच्यासाठी हे खूप मोठं यश आहे. खरंतर सतीश पाटील आणि चिमणराव पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष हा नवा नाही. पण आज मैदान सतीश अण्णांनी मारलंय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली तेव्हा त्यांच्यासोबत 40 आमदार गुवाहाटीला गेले होते. त्या 40 आमदारांमध्ये एरंडोलचे चिमणराव पाटील हे आमदारही होते. त्यावेळी चिमणराव पाटील हे मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर केलेल्या टीकेमुळे चर्चेत आले होते. चिमणराव पाटील यांनी बंडखोरी केल्याचं स्पष्ट झाल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
विशेष म्हणजे चिमण आबा मंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याची चर्चा होती. पण मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तार अद्याप पार पडलेला नाही. त्यामुळे सरकार स्थापन होऊन वर्ष होत आलं तरीही चिमण आबांना मंत्रिपद मिळालेलं नाही. चिमण आबांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याच्या घेतलेल्या निर्णयांवर धुळ्यातील जनतेचं नेमकं काय मत होतं याबाबतची उत्सुकता होती. अखेर आज पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या निकालातून ते काहीसं स्पष्ट झालंय.