ठाकरे गटाने ‘या’ नेत्यांची तर अगदीच ‘किंमत’ केली, पहा चंद्रकांत पाटील, संजय शिरसाट यांची किंमत किती ?

| Updated on: Apr 04, 2023 | 7:32 PM

अत्यंत कमी रुपयांचा दावा ठोकून त्या नेत्याच्या प्रतिमेला तडा गळण्याचे कामही विरोधकांकडून केले जाते. उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही असाच अगदी कमी रुपयांचा दावा ठोकून राजकीय चर्चेला आणखी एक विषय दिला.

ठाकरे गटाने या नेत्यांची तर अगदीच किंमत केली, पहा चंद्रकांत पाटील, संजय शिरसाट यांची किंमत किती ?
SHIVSENA LEADERS
Image Credit source: TV9 NETWORK
Follow us on

मुंबई : राजकारणात प्रत्येक पक्षाच्या नेत्याने आपली स्वतःची अशी एक प्रतिमा निर्माण केलेली असते. मात्र, हा नेता जेव्हा प्रतिपक्षावर जेव्हा पातळी सोडून टीका करतो, आरोप करतो त्यावेळी प्रतिपक्षाकडूनही त्याच्यावर उलटवार केला जातो. कधी कधी तर त्या उजळ प्रतिमेच्या नेत्याला मानहानीचा दाव्यालाही सामोरे जावे लागते. मात्र हे दावे काही लाखात, काही कोटीत असतात. परंतु, अत्यंत कमी रुपयांचा दावा ठोकून त्या नेत्याच्या प्रतिमेला तडा गळण्याचे कामही विरोधकांकडून केले जाते. उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही असाच अगदी कमी रुपयांचा दावा ठोकून राजकीय चर्चेला आणखी एक विषय दिला.

 

हे सुद्धा वाचा

किरीट सोमय्या यांच्याविरोधात 100 कोटींचे दोन दावे

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सातत्याने अलिबाग येथील कोर्लई तसेच महाकाली गुंफा जमीन प्रकरणी बिनबुडाचे आरोप केले. त्यांच्या या आरोपामुळे कुटुंबाची तसेच पक्षाची नाहक बदनामी झाली. तसेच, जनमानसातील लोकप्रतिनिधीची प्रतिमा मलिन करुन मानसिक त्रास दिला असे सांगत उद्धव ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांनी सोमय्या यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात 100 कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.

हसन मुश्रीफ यांचाही 100 कोटींचा दावा

राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरी ईडी आणि इन्कम टॅक्सने दोन वेळा धाड टाकली. पण, त्यांच्या घरी काहीच आक्षेपार्ह आढळले नाही. तरीही किरीट सोमैया सतत माझ्यावर 127 कोटी घोटाळ्याचा आरोप करत आहेत. माझ्या पक्षाविरुद्ध, पवार साहेबांविरुद्ध बिनबुडाचे आरोप करत आहेत. त्यामुळे सोमय्या यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा मुश्रीफ यांनी दिला होता.

बावनकुळे यांचा 50 कोटींचा दावा

विधान परिषदेच्या निवडणुकीचा अर्ज दाखल करताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली संपत्ती लपविल्याचा आरोप वकील सतीश उके यांनी केला होता. ते आरोप करणारे आणि त्यांना तसे करायला लावणारे या सर्वांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. माझ्या बदनामीचा प्रकार केला. त्यामुळे सतीश उके यांच्यावर 50 कोटी रुपयांच्या अब्रू नुकसानीचा दावा आणि फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा बावनकुळे यांनी दिला होता.

नबाव मलिक यांच्यावर सव्वा कोटी रुपयांचा दावा

एनसीबी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आणि त्यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात सव्वा कोटी रुपयांचा दावा दाखल केला होता. माध्यमांमध्ये चुकीचे आरोप केले. तसेच, ट्विटरवर चुकीच्या पोस्ट टाकून बदनामी केल्याचा कट आखण्यात आला असा आरोप वानखेडे केला होता.

चंद्रकांत पाटील यांच्यावर अवघ्या सव्वा रुपयाचा दावा

भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंदकांत पाटील यांच्यावरही मानहानीचा दावा करण्यात आला होता. ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर केवळ सव्वा रुपयाचा दावा ठोकला होता. त्यांची किमंत तेवढीच आहे असा टोलाही संजय राऊत यांनी त्यावेळी लगावला होता.

राऊत कुटुंबाला पीएमसी बँक घोटाळ्यातले पैसे मिळाल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केले होते, त्यावर संजय राऊत यांनी मी नोकरदार माणूस आहे, मध्यमर्गीय आहे. घोटाळे करत बसलो असतो तर राजकारणात टिकलो नसतो असे म्हणत राऊत आरोप फेटाळले होते. तसेच, बाप दाखव नाही तर श्राद्ध कर असे आव्हान देत चंद्रकांत पाटील यांच्यावर सव्वा रुपये अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याचे ते म्हणाले होते.

लोक शंभर कोटींचा दावा करतात, पन्नास कोटींचा करतात. पण त्याची जेवढी लायकी तेवढाच सव्वा रुपये अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याचा टोलाही त्यांनी लगावला होता.

संजय शिरसाट यांची किंमत ?

एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली. अंधारे यांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल व्हावा यासाठी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. पण, गुन्हा दाखल करून घेण्यात न आल्याने त्यांनी अखेर कोर्टात धाव घेतली.

अंधारे यांनी पुणे कोर्टात आमदार शिरसाट यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकला. तसेच, संजय शिरसाट यांना मानहानीची नोटीसही पाठवली. क्रिमिनल आणि सिव्हिल अशा दोन्ही प्रकारचे खटले दाखल करत असून या केसमध्ये 3 रुपयांची अब्रुनुकसानीची मागणी केली आहे, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.

हेवी वेट नेत्यांवर ठाकरे गटाचा सर्वात कमी दावा

माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे भाजपमधील हेवीवेट नेते मानले जातात. पण, उद्धव ठाकरे गटाचे खासदार अवघ्या सव्वा रुपयाचा अब्रूनुकसानीचा दावा करून त्यांची अगदीच किंमत केली, तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांनीही शिंदे गटाचे प्रमुख नेते संजय शिरसाट यांच्यावर तीन रुपयांचा दावा करून त्यांचीही किंमत दाखवून दिली. या सुषमा अंधारे यांच्या या दाव्यामुळे पुन्हा एकदा मानहानीच्या दाव्याचा विषय चर्चेत आला.