जुना शिवसैनिक पुन्हा ‘मातोश्री’वर, येवल्यात छगन भुजबळांना शिवेसना घेरणार

| Updated on: Aug 02, 2019 | 3:38 PM

येवला-लासलगाव मतदारसंघाचे माजी आमदार कल्याणराव पाटील (Kalyanrao Patil) यांची घरवापसी झाली आहे. कल्याणराव पाटील (Kalyanrao Patil) यांनी मुंबई येथे मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत प्रवेश केला.

जुना शिवसैनिक पुन्हा मातोश्रीवर, येवल्यात छगन भुजबळांना शिवेसना घेरणार
Follow us on

नाशिक : येवला-लासलगाव मतदारसंघाचे माजी आमदार कल्याणराव पाटील (Kalyanrao Patil) यांची घरवापसी झाली आहे. कल्याणराव पाटील (Kalyanrao Patil) यांनी मुंबई येथे मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत प्रवेश केला. मागील पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्यामुळे कल्याणराव पाटील  नाराज होऊन भाजपात गेले होते. मात्र आज त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी खासदार संजय राऊत, मिलिंद नार्वेकर ,जिल्हाप्रमुख सुनील पाटील, संपर्क प्रमुख भाऊ चौधरी आणि लासलगाव येथील पंचायत समिती सदस्य शिवा सुरसे हे उपस्थितीत होते

कल्याणराव पाटील हे येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघात तब्बल दहा वर्ष आमदार होते. आता पुन्हा ते शिवसेनेत डेरेदाखल झाल्याने या मतदारसंघात शिवसेनेची ताकद नक्कीच वाढणार आहे.

नाशिक स्थानिक स्वराज संस्थेचे विधानपरिषदेचे आमदार नरेंद्र दराडे आणि नाशिक विभागीय शिक्षक विधानपरिषदेचे आमदार किशोर दराडे हे येवला येथील स्थानिक रहिवाशी आहेत. हे दोघे दराडे बंधू शिवसेनेचे आमदार असल्याने शिवसेनेची असलेली ताकद त्यात कल्याणराव पाटलांनी पुनर्प्रवेश केल्याने आणखी वाढली. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासमोर आता कडवे आव्हान उभे झाले आहे.

येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघाच्या 2004 च्या  पंचवार्षिक निवडणुकीत कल्याणराव पाटील यांनी छगन भुजबळ यांच्या विरोधात उमेदवारी दाखल करत, भुजबळांना कडवी लढत दिली होती. 2009 मध्ये भुजबळांचे निकटवर्तीय माणिकराव शिंदे यांना शिवबंधन बांधत त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र माणिकराव शिंदे यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला होता.

यानंतर पुन्हा 2014 मध्ये भुजबळांविरोधात कल्याणराव पाटील यांना उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्न झाला. मात्र शिवसेनेने तत्कालिन जिल्हा परिषद सदस्य संभाजी पवार यांना उमेदवारी दिल्याने, कल्याणराव पाटील नाराज झाले होते. त्यांची नाराजी इतकी तीव्र होती की ते थेट विरोधक छगन भुजबळ यांच्या मंचावर गेले होते.

मात्र आता कल्याणराव पाटील यांच्या पुन्हा शिवसेना प्रवेशामुळे, आता 2019 मध्ये छगन भुजबळांविरोधात कोणाला उमेदवारी मिळते हे पाहावं लागेल. सध्या कल्याणराव पाटील, गेल्या निवडणुकीत उमेदवारी मिळालेले संभाजी पवार, येवला पंचायत समितीचे विद्यमान उपनगराध्यक्ष रूपचंद भागवत यांच्यात चुरस असेल.