मुंबई : राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. ठाकरे गटाकडून पुन्हा एकदा न्यायालयात (Court) धाव घेण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने (Election Commission) धनुष्यबाण हे चिन्ह गोठावलं आहे. या चिन्हावर शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही गटाकडून दावा करण्यात आल्यानं निवडणूक आयोगाकडून चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच निवडणूक आयोगाचा पुढील निर्णय येईलपर्यंत दोन्ही गटाला शिवसेना हे नाव देखील वापरता येणार नाहीये. याचा सर्वाधिक फटका हा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गटाला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात दिल्ली हाय कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.
शनिवारी निवडणूक आयोगाकडून धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आलं आहे. चिन्ह गोठवण्यात आल्यानं आता ठाकरे गट तसेच शिंदे गट यांना धनुष्यबाण हे चिन्ह वापरता येणार नाहीये. सोबतच शिवसेना हे नाव देखील वापरता येणार नाहीये. त्यामुळे आज शिंदे गट आणि ठाकरे गट चिन्ह आणि नावासाठी प्रत्येकी तीन पर्याय निवडणूक आयोगाकडे सादर करणार आहेत. मात्र त्यापूर्वीच ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.
ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे नावासाठी तीन पर्याय सादर केले आहेत. त्यामध्ये शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीन पर्यायाचा समावेश आहे. मात्र यातील जे पहिले दोन पर्याय आहेत शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे याच नावाचा शिंदे गटाकडून देखील विचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा दोन्ही गट आमने-सामने येण्याची शक्यता आहे.