सातारा : पालिका निवडणुका (Maharashtra Municipal Corporation Elections) जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत, तसतसा पाठिंबा मिळवण्यासाठी शिंदे (Eknath Shinde group) गटाकडून जोरदार प्रयत्न सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. पश्चिम महाराष्ट्रातील साताऱ्यात (Satara Shivsena) शिंदे गटाचं बळ आता अधिक वाढलंय. साताऱ्यातील शिवसेनेच्या युवा नेत्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटाला समर्थन दिलंय. शिवाय एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आपला पाठिंबा दर्शवत शिंदे गटात प्रवेश केलाय. त्यामुळे साताऱ्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा हादरा बसलाय. साताऱ्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटाला समर्थन दिल्यामुळे उद्धव ठाकरेंसमोरची आव्हानं आता वाढली आहेत.
शिवसेनेचे साताऱ्यातील युवा नेते आणि युवासेवा जिल्हाप्रमुख रणजित सिंह भोसले हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले. मुंबईतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी रणजित सिंहे भोसले यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश केला.
यावेळी उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई हे देखील उपस्थित होते. गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या शिंदे गटातील आमदार आणि मंत्री शंभुराज देसाई, आमदार महेश शिंदे आणि पुरुषोत्तम जाधव यांच्या प्रयत्नांना अखेर यश आल्याचं यानिमित्ताने पाहायला मिलालं.
रणजितसिंह भोसले हे साताऱ्यातील युवा नेते आहेत. त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे साताऱ्यात शिंदे गटाची ताकद वाढली आहे. सातारा जिल्ह्यात शिंदे गटाला आता अधिक समर्थन मिळवण्याच्या दृष्टीने बळ मिळेल, अशा विश्वास व्यक्त केला जातोय.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबईतही वेगवेगळ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेटी देत आपलं समर्थन वाढवण्याच्या दृष्टीने शिंदेंकडून प्रयत्न झाल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर बीएमसीतील वडाळ्याचे माजी शिवसेना नगरसेवकही शिंदेंच्या गटात सामील झाल्याचं बोललं जातंय. तर इतर पालिकांमध्येही नगरसेवकांचा पाठिंबा शिंदेंना मिळालाय. आता हेच चित्र साताऱ्यातही पाहायला मिळतंय.