जळगाव: केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (ramdas athawale) यांचाच पक्ष भाजपच्या (bjp) दावणीला बांधलेला आहे. ते काय शिवसेनेच्या भविष्यावर बोलतील, अशी खरमरीत टीका राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (gulabrao patil) यांनी आठवलेंवर केली आहे. आठवले म्हणजे भाजपचे कुणी निर्णायक नेते नाहीत. त्यांनी बोलण्याआधी भाजप तसेच शिवसेनेच्या नेत्यांची परवानगी घ्यावी. त्यांचे विधान अत्यंत चुकीचे आहे. आठवलेंसारख्या नेत्यांना असं बोलणं शोभत नाही, असंही पाटील म्हणाले. रामदास आठवले यांनी शिवसेनेवर टीका केली होती. शिवसेना स्वबळावर लढली तर शिवसेनेचे तीन चार खासदारही निवडून येणार नाही. शिवसेनेची परिस्थिती काँग्रेससारखी झाली आहे, अशी टीका रामदास आठवले यांनी केली होती. गुलाबराव पाटील जळगावमध्ये मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी मीडियाच्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी जळगावच्या तेजस मोरेचे नाव घेतल्याने याबाबत मंत्री गुलाबराव पाटील यांना विचारले असता या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याने त्यावर बोलणे उचित होणार नाही. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील याबाबत विधानसभेत सोमवारी खुलासा करणार आहेत. त्यानंतर याप्रकरणातील नेमके सत्य काय ते बाहेर येईल. म्हणजेच दूध का दूध पानी का पानी होईलच, असे गुलाबराव पाटील म्हणाले.
देशातल्या चार राज्यांत भाजपला निवडणुकीत मोठे यश मिळालं आहे. यामुळे नक्कीच त्यांची स्फूर्ती वाढली आहे. याचा अर्थ महाराष्ट्रातील निवडणुकीत ते बहुमत मिळवतील असा होत नाही. महाराष्ट्रातील निवडणुकांना दोन ते अडीच वर्षांचा काळ आहे. राजकारणात रोज बदल होत असतो. त्यामुळे देशातील निवडणुकांमध्ये यश मिळालं तर भाजपला महाराष्ट्रातही यश मिळेल असं होत नसल्याचंही त्यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या:
राज्यात नोटीस देण्याची पद्धत नव्हती, जबाबदार व्यक्तीने बोलताना भान बाळगावं; अजितदादांचा सल्ला
राज्यात 5 हजार 142 गावांमध्ये राबवणार नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना; कसा होणार शिवाराचा कायापालट?
डोंबिवली जवळील उंबार्ली टेकडीला वणवा, अग्निशमन विभागासह ग्रामस्थांच्या प्रयत्नानंतर आग अटोक्यात