मुंबई : शिवेसेने नेते तथा आमदार तानाजी सावंत पक्षावर नाराज असून लवकरच ते नव्या भूमिकेत दिसतील अशी चर्चा सुरु आहे. दरम्यान, चर्चेला उधाण आल्यानंतर खुद्द तानाजी सावंत यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. मी शिवसेना पक्षात आहे. पक्षाने माझ्यावर दिलेली जबाबदारी मी सजग होऊन पार पाडत आहे. मी शिवसेना पक्षातच राहणार आहे, असं सावंत यांनी म्हटलंय. तसेच बदनामीसाठी हे सारं केलं जात असल्याचा आरोपदेखील त्यांनी केलाय. ते ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते.
आगामी काळात तुम्हाला काही बदल दिसतील. मी लवकरच नव्या भूमिकेत दिसणार आहे. त्यानंतर माझ्याकडे काय मागायचे आहे ते मागा, असे तानाजी सावंत म्हटल्याचा दावा केला जात होता. त्यानंतर लवकरच ते पक्षांतर करतील असे म्हटले जात होते. सावंत यांच्या नाराजीच्या चर्चेने जोर धरल्यानंतर त्यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी मी सध्या शिवसेना पक्षात असून शिवसेनेतच काहील असे सांगितले आहे. तसेच शिवसेना पक्षाने माझ्यावर जबाबदारी दिली आहे. ती जबाबदारी मी सजग होऊन पार पाडत आहे. कोण काय म्हणतंय तसेच काय चर्चा करतोय याकडे मी लक्ष देत नाही, असंदेखील सावंत यांनी निक्षूण सांगितलंय.
काही दिवसांपूर्वी तानाजी सावंत यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीमुळेदेखील सावंत यांच्या पक्षांतराच्या चर्चेने जोर धरला होता. यावर बोलताना फडणवीस व माझ्या भेटीचा विपर्यास केला गेला. या भेटीत शैक्षणिक कामावर चर्चा करण्यात आली. मात्र वेगळा अर्थ काढला गेला. मला जणीवपूर्वक बदनाम केले जात आहे. मी नाराज नाही, असे तानाजी सावंत म्हणाले.
दरम्यान, सावंत यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये मला कोरड्या राजकारणात रस नाही. लवकरच नव्या भूमिकेत दिसणार आहे, असे ते म्हणत असल्याचे दिसत आहे. याच व्हिडीओचा आधार घेत सावंत शिवसेनेवर नाराज असल्याचे म्हटले जात आहे. “रोजगार निर्मिती करतो त्यात आपली मुलं असली पाहिजेत. नुसतं राजकारण नुसतंच राजकारण याचा उपयोग नाही. कोरडे राजकारण होणार असेल तर त्या गोष्टीत मला इंटरेस्ट नाही. निवडणूक लढणे आणि त्यात जिंकून येणे ही बाब मी दुय्यम समजतो. समाजसेवा आपली चालू आहे. 40 वर्षे कोणी पाहिले नाही आपल्याकडे. लोकांना काही दिले पाहिजे त्यांची गरिबी दूर झाली पाहिजे या पद्धतीने तुमच्या सहकार्याची गरज आहे. येत्या 2 ते 4 महिन्यात दिवस बदलतील. एका वेगळ्या रुपात मी तुमच्यासमोर येणार आहे. त्यावेळी काय मागायचे ते मागा,” असे सावंत व्हायरल होत असलेलेल्या व्हिडीओत बोलताना दिसत आहेत. सावंत यांचा हा व्हिडिओ 1 महिना जुना आहे. हा व्हिडिओ 3 दिवसांपूर्वी झालेल्या फडणवीस यांच्या भेटीशी जोडून विपर्यास केला जात आहे, असे सावंत यांनी सांगितले.
इतर बातम्या :